वसतिगृह व भोजन व्यवस्था सुरू होणार : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनाने आंदोलन मागेगडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत येथील मुला-मुलींचे चारही वसतिगृह बंद करण्यात आले. तसेच वसतिगृहात राहण्यासाठी प्रवेशीत जुन्या मुला-मुलींना मनाई करण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वसतिगृहाचे विद्यार्थी वसतिगृहाबाहेर रस्त्यावर स्वयंपाक करून भोजन आटोपत होते. विद्यार्थ्यांचे मोठे हाल सुरू होते. सदर गंभीर समस्या घेऊन सोमवारी वसतिगृहातील शेकडो विद्यार्थी व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. दरम्यान जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून आज सोमवारी सायंकाळपासून चारही वसतिगृह सुरू करून भोजन व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत वसतिगृहातील जुन्या व नवीन विद्यार्थ्यांची प्रवेश यादी मंजूर झालेली नाही. तसेच भोजन कंत्राटाचे मंजूर झाले नाही. या सबबीवरून वसतिगृहात राहण्यास विद्यार्थ्यांना मनाई करण्यात आली. त्यापूर्वी प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या सुचनेवरून शुक्रवारी लांझेडा येथील वसतिगृहाच्या अधीक्षिकेने व काही कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास १४ मुलींना वसतिगृहात काढले. त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यानंतर सदर १४ मुलींना रात्री वसतिगृहात ठेवण्यात आले.
मात्र त्यानंतर शनिवारी व रविवारी मुला-मुलींना भोजन देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वगावी परतले. आदिवासी विद्यार्थी संघ व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या वतीने पोटेगाव मार्गावरील वसतिगृहासमोर विद्यार्थी स्वत: स्वयंपाक करून भोजन आटोपत होते. येथील विद्यार्थी वसतिगृहाच्या समोरच वास्तव्यास होते.
सोमवारी सदर गंभीर प्रश्नाला घेऊन विद्यार्थ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली व जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. येत्या पाच दिवसांत वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या मार्गी लावणार, असे आश्वासन जिल्हाधिकारी नायक यांनी काँग्रेसचे पदाधिकारी व वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना दिले.
याप्रसंगी युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्रअध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, पं. स. सदस्य अमिता मडावी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, एजाज शेख, नितेश राठोड, गौरव अलाम, आविसंचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष क्रांती केरामी, सचिव प्रकाश मट्टामी यांच्यासह शेकडो विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनातील मागण्या* वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्काचे हनन करून त्यांना जबरदस्तीने वसतिगृहाच्या बाहेर काढणाऱ्या गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, कुलकर्णी व लांझेडा येथील मुलींच्या वसतिगृहाचे गृहपाल स्वाती पांडे यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे.* ज्या विद्यार्थ्यांचा आॅनलाईन अर्ज आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड झालेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे आॅफलाईन अर्ज स्वीकारून त्यांना गुणवत्तेनुसार वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा.* ज्या वसतिगृहाच्या गृहपालांनी जुन्या प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला नसेल, अशा गृहपालांना निलंबित करण्यात यावे.* सन २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ या सत्रातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी.* जिल्ह्यातील सर्व शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह तत्काळ सुरू करावे.* प्रवेश विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात यावी.बेमुदत साखळी उपोषणाचा इशाराजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातील सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्या, तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या, पाच दिवसांत समस्या निकाली न काढल्यास १ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थी संघ व युवक काँग्रेस गडचिरोलीच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा आविसं व काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.