ऑनलाइन लोकमततुळजापूर, दि.06 - शारदीय नवरात्रोत्सवातील गुरूवारी सहाव्या माळेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या नित्योपचार पंचामृत अभिषेक पुजेनंतर देवीची मुरली अलंकार विशेष महापूजा मांडण्यात आली होती. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. गुरूवारी रात्री दीडच्या सुमारास पारंपारिक चरणतीर्थ विधी पार पडल्यानंतर नैवेद्य, आरती होवून धर्मदर्शन व मुखदर्शन रांगेतून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. सकाळी सहा वाजता अभिषेक विधीसाठी घाट झाल्यानंतर पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला. सकाळी अकरा वाजता अभिषेक संपून नैवेद्य धुपारती व अंगारा असे धार्मिक विधी पार पडले. यानंतर भोपी पुजारी व महंत यांनी श्री तुळजाभवानी मातेची विशेष अलंकार महापूजा मांडली. या नेत्रदीपक पुजेचे हजारो भाविकांनी ‘आई राजा उदो उदो’ चा जयघोष करीत दर्शन घेतले.बुधवारी पाचव्या माळेदिवशी वाढलेली गर्दी पाहून गुरूवारी यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यापारी व पुजाऱ्यांना होती. परंतु, तो अंदाज चुकीचा निघाला. बुधवारच्या तुलनेत गुरूवारी भाविकांच्या संख्येत जवळपास निम्याने घट झाली होती. जुन्या बसस्थानकात सोलापूरसाठी तर नव्या बसस्थानकात हुमनाबाद, गुलबर्गा व लातूरकडे जाणाऱ्या जादा बसगाड्यांची रांग लागली होती. फिरते व्यापारी व गाडा फेरीवाल्यांने बसस्थानक ते आंबेडकर चौक या रस्त्यावर ठिय्या मांडल्याने हा भाग गर्दीने गजबजून गेला आहे
मुरली अलंकार महापुजेस हजारो भाविकांची हजेरी
By admin | Published: October 06, 2016 8:08 PM