ऑनलाइन लोकमततळोदा, दि. २१ : अपरिपक्व उसाचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर केला जात असल्यामुळे तळोदा येथून शेकडो टन ऊस परजिल्ह्यात नेला जात आहे. यामुळे साखर कारखान्यांपुढे गळीताचा प्रश्न उभा राहिला आहे. यात आता कारखान्यांनी शेतकऱ्यांची मनधरणी सुरू केली आहे. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
तळोदा तालुक्यात साधारण सात हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यातही आमलाड, तळवे, धानोरा, मोरवड, मोहिदा, मोड, सलसाडी, दसवड, खरवड व बोरद या भागात उसाचे मोठे क्षेत्र आहे. गेल्या आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड केलेल्या या उसाचा चारा म्हणून जनावरांसाठी वापर केला जात आहे. त्यामुळे शेकडो टन उसाची वाहतूक नगर जिल्ह्यात केली जात आहे. विशेषत: सायंकाळच्या वेळी वजनकाट्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येते. या उसातून शेतकऱ्यांना टनामागे एक हजार ९०० ते दोन हजार रुपये मिळतात.
शिवाय संबंधित दलाल स्वखर्चाने तोडणी करून घेऊन जातो. त्यामुळे पावसाळ्यात नेमक्या कडकीच्या मोसमात शेतकऱ्यांना मुबलक पैसा मिळत आहे. गेल्या वर्षी तळोदा तालुक्यात साडेचार हजार हेक्टरची लागवड झाली होती. यात साधारण ६०० हेक्टर आडसाली उसाचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.