ऑनलाइन लोकमतगडचिरोली, दि. 19 : जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात आधीच संपर्काच्या सुविधा कमी असताना दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने शेकडो गावे संपर्काबाहेर गेली आहेत. प्रमुख नद्यांसह ठिकठिकाणच्या नाल्यांना, ओढ्यांना पूर आल्यामुळे ठेंगणे पूल पुराच्या पाण्याखाली गेले. त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात तीन दिवसांत तिघांना जलसमाधी मिळाली.मंगळवारी रात्री आरमोरीलगतच्या नाल्याला आलेल्या पुराजवळ आपली दुचाकी थांबवून मोबाईलवर बोलत असलेल्या मयूर वामन प्रधान (२३) या एलआयसी एजंट असलेल्या युवकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. सोमवारी त्याचा मृतदेह सापडला. त्याआधी चामोर्शी तालुक्यातील घोटजवळच्या नाल्याच्या पुरात ऋषी तुकाराम तुंकलवार (६०) या वृद्धाला जलसमाधी मिळाली आहे. तसेच देसाईगंजनजिक वैनगंगा नदीच्या पात्रात मासेमारी करण्यासाठी विनोद शंकर कांबळे (३५) रा.देसाईगंज हा बुधवारी सकाळी गेला होता. मात्र पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने तो पाण्यात बुडून मरण पावला. त्याचा मृतदेह सापडला आहे.बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात १२१.४ मिमी पावसाची नोंद झाली. १२ पैकी ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात अवघ्या २४ तासात भामरागड तालुक्यात सर्वाधिक ३४२.५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीला महापूर येऊन पुराचे पाणी गावात शिरून जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला आहे. वीज पुरवठाही रात्रीपासून खंडित झाला आहे. यामुळे नदीपलिकडच्या शंभरावर गावांचा संपर्क तुटला आहे. चामोर्शी तालुक्यात २६३.२ मिमी पाऊस झाल्याने रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह सर्वांची मोठी तारांबळ उडाली. अतिवृष्टी झालेल्या इतरही तालुक्यांमध्ये बुधवारी सायंकाळपर्यंत अनेक गावांचा संपर्क तुटलेला होता.गडचिरोली शहराच्या अनेक खोलगट भागाला तलावाचे रूप आले आहे. मंगळवारी रात्री धो-धो पाण्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना सर्वांनाच मोठी कसरत करावी लागत होती. बुधवारी सकाळी ११ नंतर पावसाने थोडी उसंत घेतली.
https://www.dailymotion.com/video/x8458ph
दहावी-बारावीचे विद्यार्थी पेपरपासून वंचितगडचिरोली जिल्ह्यात दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा सुरू आहे. गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा व कुरखेडा या पाच ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू आहे. बुधवारी दहावीचा हिंदी तर बारावीचे गणित व संख्याशास्त्र तथा पीकविज्ञान हे पेपर होते. मात्र पावसामुळे अनेक मार्ग बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जे पोहोचले त्यांना गुडघ्यापेक्षा जास्त खोल पाण्यातून परीक्षा केंद्रांवर पोहोचावे लागले. चामोर्शी येथील शिवाजी हायस्कूल या बारावीच्या परीक्षा केंद्रावर ५ पैकी ३ विद्यार्थी अनुपस्थित होते. हीच परिस्थिती कमीअधिक प्रमाणात इतरही केंद्रांवर होती. लोकबिहादरीलाही फटकाप्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांच्या भामरागडलगतच्या लोकबिरादरी प्रकल्पाचा परिसरही अतिवृष्टीने जलमय झाला होता. पुराने फुगलेल्या पर्लकोटा नदीचे पाणी बऱ्याच दूरपर्यंत पसरले होते. मंगळवारी रात्रभर प्रकल्पाच्या परिसरात जिकडे-तिकडे पाणी साचले होते. सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हे पाणी ओसरले. या ठिकाणी परिसरातील आदिवासी नागरिक उपचारासाठी येत असतात. परंतू पावसाळ्यात दरवर्षी या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शंभरावर गावांचा संपर्क तुटतो. शासनाने पर्लकोटा नदीचे खोलीकरण करावे, जेणेकरून पुराची तीव्रता कमी होईल, अशी अपेक्षा अनिकेत प्रकाश आमटे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केली.