धामणगाव रेल्वे/अमरावती, दि. 14 - शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा यासह विविध मागणींसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने तब्बल दोन तास देवगावात रस्ता रोको करण्यात आला. दरम्यान अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यासह शेकाडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली.
शासनाने शेतक-यांना दिलेली कर्ज माफी ही फसवी असून संपूर्ण सातबारा कोरा करावा या मागणीसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी 10 वाजता औरंगाबाद-नागपूर या महामार्गाच्या देवगाव चौफुलीवर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान दोन्ही बाजूच्या वाहतुकीची तब्बल ४ किलोमीटरपर्यंत वाहनाची रिघ लागली होती.
चांदूर रेल्वे उपविभागील तळेगाव दशासर, दत्तापूर मंगरूळ दस्तगीर, चांदूर रेल्वे येथील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन जामिनावर सुटका केली. या आंदोलनात प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रवीण हेंडवे, अमर ठाकरे, तेजस धुवे, दिलीप गावंडे, विशाल सावरकर, सर्फराज पठान, राहुल लांबाडे, अतुल नागमोते, संदीप ठावरे, मंगेश सोनेवने, मुकूंद कोल्हे, नितीन चव्हाण, गजानन निमकर, सचिन झोड, अवधुत डबळे, या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.