नरेश डोंगरेनागपूर : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात आपले मायाजाल निर्माण करणारा डेरा सच्चा सौदा प्रमूख बाबा राम रहीम याच्या प्रकरणाचे हिंसक लोण महाराष्ट्रात पसरू शकते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा यंत्रणांनी तातडीने प्रभावी उपाययोजना केल्या. त्यामुळे महाराष्ट्रात या प्रकरणाचे कुठेही हिंसक पडसाद उमटले नाही. मुंबईसह अन्य एक-दोन नगरात बाबा राम रहीमचे बोटावर मोजण्याएवढे समर्थक होते. त्यांनी या प्रकरणात राळ उठविण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना लगेच थंड केले.साध्वी बलात्कार प्रकरणात राम रहीमला न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर त्याच्या कथित समर्थक गुंडांनी पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानातील काही भागात प्रचंड हैदोस घातला. दगडफेक, तोडफोड, जाळपोळीचे हिंसक लोण पसरल्याने या तीन राज्यात अनेकांचे बळी गेले आणि ५० पेक्षा जास्त जखमी झाले. कोट्यवधींच्या मालमत्तेचीही हानी झाली. देशातील अन्य राज्यात हे लोण पसरू नये म्हणून गुप्तचर यंत्रणांनी ठिकठिकाणच्या सुरक्षा यंत्रणांना अलर्ट दिला.
महाराष्ट्रात विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या आगमनाची धूम सुरू असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांवर शुक्रवारी थोडासा ताण होता. तशात राम रहीमच्या प्रकरणावरून समाजकंटकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा डाव टाकला जाऊ शकतो, हे ध्यानात आल्यामुळे राज्यात बाबा राम रहीमचे समर्थक कोणकोणत्या भागात आहेत, त्याची तातडीने माहिती काढण्यात आली. बहुतांश मोठ्या शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राम रहीमच्या समर्थकांची माहिती संकलित करण्याची मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, राज्यातील नवी मुंबईसह एक दोन ठिकाणच्या बोटावर मोजण्याएवढ्या व्यक्तींचा अपवाद वगळता राज्यातील कोणत्याही भागात राम रहीमचे मायाजाल नसल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले. त्यामुळे राज्याच्या सुरक्षा यंत्रणांवरचा ताण कमी झाला. मात्र, नवी मुंबई, मुलुंड आणि नांदेडमध्ये राम रहीमच्या कथित समर्थकांकडून हिंसक कारवाया घडवून आणण्याची भीती या शोधमोहिमेतून अधोरेखित झाली होती. त्यामुळे या नगरात सुरक्षेच्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या. अचानक त्या नगरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. हे करतानाच अफवा पसरणार नाही, याची खास काळजी घेण्यात आली.त्याचे चांगले परिणाम समोर आले. उल्लेखित भागात एक-दोन ठिकाणी राम रहीमचे समर्थक बैठका घेऊन काहींना चिथावणी देण्याची तयारी करीत असल्याचे लक्षात येताच त्यांना लगेच थंड करण्यात आले. त्यांच्या व्यतिरिक्त कुणाला त्याचा थांगपत्ताही लागू शकला नाही.विदर्भात नाही सापडला समर्थकपंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानातील काही भागात हिंसक घटनांनी अराजक निर्माण झाले असताना नागपूर - विदर्भात पोलीस, गुप्तचर यंत्रणा राम रहीमच्या समर्थकांची शोधाशोध करीत होत्या. मात्र, राम रहीमचा एकही समर्थक पोलिसांना गवसला नाही. या संदर्भात वरिष्ठ अधिकाºयांची प्रतिक्रिया मिश्किल होती. आम्हाला तर सापडतच नाही, तुमच्या लक्षात कुणी राम रहीमचा कथित समर्थक असल्यास आम्हाला कळवा, असे वरिष्ठ अधिकारी म्हणत होते.न्यायालयाने दोषी ठरविलेल्या एखाद्या आरोपीच्या समर्थनार्थ गुंडगिरी करून अनेकांचे बळी घेणे, अनेकांना जखमी करणे, जाळपोळ, तोडफोड करणे यात कसली आली श्रद्धा? महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. चांगले काय, वाईट काय, याचे आम्हाला भान आहे. त्यामुळे असल्या कुप्रवृत्तीला येथे समर्थन मिळण्याचा प्रश्नच उरत नाही. त्याचमुळे महाराष्ट्रात बाबा राम रहीमचे कुठे समर्थक दिसून आले नाहीत. - संजय बर्वेअतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई