मुंबई : राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना आता उन्हाळी सुट्ट्यांचं प्लॅनिंग करता येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवावे, असा आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने काढला होता. या आदेशामुळे अनेक शाळांतून नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी हा आदेश मागे घेतल्याची माहिती विधानसभेत दिली. तसेच, यासंदर्भात अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, राज्य विद्या प्राधिकरणाने संकलित मूल्यमापनाची प्रक्रिया संपल्यानंतर अनेक शाळांमध्ये अध्ययन-अध्यापन होत नाही, त्यामुळे विद्यार्थी शाळेत जात राहात नाहीत. यामुळे प्रत्येक शाळेमध्ये संकलित चाचणीनंतर उन्हाळी सुट्टी सुरू होईपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असेही या आदेशात म्हटले होते. शाळेत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे यासाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन किंवा विविध उपक्रम राबवण्यात यावे, असे आदेशही शाळांना दिले होते. राज्यातील सर्व शाळांमध्ये वार्षिक परीक्षा मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होतात. तर काही विद्यार्थ्यांच्या 20 एप्रिलपर्यंत संपतात. परीक्षा संपल्यानंतर शक्यतो विद्यार्थी शाळेत जात नाहीत, तर थेट परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी शाळेत जातात.
हुर्रेर्रे... परीक्षा संपताच सुट्टी सुरू; विनोद तावडेंकडून 'तो' निर्णय मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 11:36 AM