- युगंधर ताजणे।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नवरा-बायकोची भांडणे आता थेट वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाऊन पोहचली आहेत. एक मेकांवर केले जाणारे आरोप, मोबाइलवर झालेल्या संभाषणाच्या क्लिप, स्क्रीन शॉट हे बिनधास्तपणे फेसबुकच्या अकाऊंटवर शेयर केले जात आहेत. प्रियकर- प्रे्रयसीमधील बेवनावदेखील व्हॉट्सअॅप ‘डीपी’तून सगळ्यांसमोर येऊ लागला आहे. यामुळे घरातील भांडणे थेट सोशल मीडियातून चव्हाट्यावर आले आहेत.काही केल्या स्वत:चे अस्तित्व सिद्ध करणे ही दोघांकरिता अस्मितेची बाब होऊन बसत असल्याने सामाजिक माध्यमांवर जोडप्यांची भांडणे होत आहेत. याबाबत भगिनी हेल्पलाइनच्या प्रमुख व अॅड. सुप्रिया कोठारी यांनी सांगितले की, पूर्वी नवरा किंवा बायको यांना एकमेकांची माहिती काढणे तितकेसे सोपे नव्हते. सोशल माध्यमातून ती मिळवणे तुलनेने सोपे आहे. त्यामुळे अनेकदा पती- पत्नी कोर्टात एकमेकांवरील आरोप सिद्ध करण्याकरिता अशाप्रकारचे आरोप समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करतात.दुसऱ्या बाजुला भावनिक आधार शोधण्याकरिता तसेच आपल्यांवरील अत्याचारांबाबत सहानभुती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टस फेसबुकवर शेयर करताना दिसतात.सोशल मीडियावर हल्ली मोठ्या प्रमाणात नवरा बायको यांच्यातील भांडणाचे पडसाद उमटताना दिसतात. या माध्यमांवर मुळातच सर्वांना फ्री अक्सेस असल्याने त्यावर कुणालाही आपल्या मतानुसार व्यक्त होण्यास वाव आहे. पती पत्नीच नव्हे तर प्रियकर-प्रेयसी वेगवेगळया समाजमाध्यमातून भांडत आहेत. संपत चाललेली सहनशक्ती आणि तात्काळ हवे असणारे समाधान यातून रागाला मोकळी वाट करुन देण्याकरिता हा मार्ग स्वीकारला जातो. संवादाऐवजी भांडणातून जगासमोर भावना मांडण्याची क्रेझ वाढत चालली आहे.- अॅड. डॉ. चिन्मय भोसले, क्रिमिनल आणि सायबर लॉ तज्ज्ञ
पती-पत्नीतील वाद थेट सोशल मीडियावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 4:47 AM