ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - आपल्या बहिणीच्या पतीची हत्या करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या महिलेच्या चौकशीत नवा खुलासा झाला आहे. या महिलेने आपल्या पतीचीही हत्या केली असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. पतीमुळे एड्स झाल्याच्या रागात आपल्या प्रियकराच्या साथीने तिने पतीची हत्या केली. वंदन थोरबे असं या आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर निलेश सुपेकरलाही अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वंदनाने आपला पती अशोक याच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळून आधी त्याला बेशुद्ध केलं, नंतर गळा दाबून त्याची हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी दगडाने त्याचा चेहरा ठेचला. आपल्या पतीची हत्या केल्याचा गुन्हा वंदनाने कबूल केला आहे.
"वंदनाने 12 नोव्हेंबर 2012 रोजी प्रियकर निलेशत्या मदतीने पती अशोक थोरबे याची हत्या केली. आणि त्यानंतर बीडच्या जंगलात नेऊन मृतदेह टाकून दिला. आपल्या पतीच्या बेपत्ता होण्याची कोणतीच तक्रारही तिने पोलीस ठाण्यात दिली नव्हती. वंदनाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे", अशी माहिती सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी दिली आहे.
पतीमुळे झाला होता एड्स -
अशोक थोबरे बेरोजगार होता. तसाच तो एड्सग्रस्तदेखील होता. त्याचा हा आजार वंदनालाही झाला होता, ज्यामुळे ती नाराज होती. यादरम्यान वंदना अमहदनरमधील निलेश सुपेकरच्या संपर्कात आली आणि त्याच्या मदतीने पती अशोकची हत्या केली.
वंदनावर आपली बहिण आशा वानखेडेचा पती प्रकाश वानखेडे याची हत्या केल्याचाही आरोप आहे. गेल्यावर्षी 11 एप्रिलला तिने हत्या केली होती. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. 27 एप्रिल 2016 रोजी आशा वानखेडे यांनी पती बेपत्ता असल्याची तक्रार चारकोप पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपासादरम्यान आशा, वंदना आणि निलेश या तिघांना अटक केली होती.