ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 16 - फेसबूक, व्हॉटस्अॅपवरून पत्नीच्या डोक्यावर संशयाचे भूत नाचू लागल्याने एक सुखी संसार उद्ध्वस्त झाला. सधन आणि उच्चशिक्षित दाम्पत्यात वारंवार वाद होऊ लागले. त्यामुळे आरोपी पतीने आपल्या पत्नीला शेवपुरीतून विष देऊन तिची हत्या केली. 2 जानेवारीच्या रात्री घडलेल्या या घटनेला तब्बल साडेतीन महिन्यांनंतर वाचा फुटली. परिणामी आपल्या आईची हत्या करणा-या वडिलाविरुद्ध 13 वर्षीय मुलीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. लकडगंज पोलिसांनी राधेश्याम गंगाप्रसाद तिवारी (वय 42) नामक आरोपीला अटक केली. रेखा राधेश्याम तिवारी (वय 40)असे मृत महिलेचे नाव असून, आरोपीचे नाव राधेश्याम गंगाप्रसाद तिवारी आहे. गरोबा मैदान, छापरूनगर येथे राहणारा आरोपी तिवारी वाहतूक व्यावसायिकाकडे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. त्याची पत्नी रेखा (40) उच्चशिक्षित होती. ती शिकवणी घ्यायची. त्यांना एक मुलगी (13) आणि एक मुलगा (9) आहे. सर्व काही सुरळीत होते. मात्र, तिवारी घरी आल्यानंतर तास न् तास फेसबूक, व्हॉटस्अॅपच्या चॅटिंगमध्ये गुंतून राहायचा. त्यामुळे रेखा त्याच्यावर संशय घेऊ लागली. तो बाहेरख्याली असल्याचा तिचा समज झाल्यामुळे त्यांच्यातील वाद वाढले. ती एकाच विषयावरून वारंवार वाद करीत असल्यामुळे तिवारीचे पत्नीसोबत अजिबात पटत नव्हते. त्यामुळे त्याने तिच्या हत्येचा कट रचला. 2 जानेवारीला रात्री 8.30 वाजता मुलगी मुस्कानने त्याला फोन केला. मम्मीला 2 हजारांच्या नोटेचे सुटे पाहिजे, असे मुस्कानने सांगितले. त्यामुळे आरोपी घरी आला. त्याने पत्नीकडून 2 हजारांची नोट घेतली. मुस्कान आणि मुलाला सोबत घेतले. त्यांना एका टपरीवर नेऊन शेवपुरी खाऊ घातली. तेथून चिल्लर करतानाच पुन्हा एक शेवपुरी पार्सल बांधून ठेवायला सांगून या मुलांना घेऊन घरी आला. काही वेळेनंतर पुन्हा बाहेर जाऊन त्याने शेवपुरीचे पार्सल आणले आणि रेखाला खायला दिले. शेवपुरी खाल्लयानंतर रेखाची प्रकृती खालावली. तिला मेयोत नेल्यानंतर काही वेळेतच डॉक्टरांनी मृत घोषित केले.अखेर पापाला वाचा फुटली लकडगंज पोलिसांनी त्यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, शल्यचिकित्सा अहवालात रेखाचा मृत्यू विषारी पदार्थ खाल्ल्याने झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. त्यामुळे पोलिसांनी गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू केली. चौकशीत या दोघांचे वाद होत असल्याचे शेजा-यांनी सांगितले. मुलांचे जबाब घेतले असता मुस्काननेही आई-वडिलांच्या भांडणांची माहिती देताना 2 जानेवारीच्या रात्रीचा घटनाक्रम पोलिसांकडे सांगितला. त्यावरून पोलिसांनी राधेश्यामला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. जी. गाडेकर यांनी मुस्कानची तक्रार नोंदवून घेत आरोपीला पत्नीच्या हत्येच्या आरोपात बुधवारी मध्यरात्री अटक केली. त्याला गुरुवारी दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. मुले पोरकी झाली घरची स्थिती चांगली, पती-पत्नी दोघेही कमावते, त्यात उच्चशिक्षित. दोन मुले असा सुखी संसार असताना फेसबुक, व्हॉटस्अॅप चॅटिंगच्या भुताने या दोघांमध्ये भांडण लावले अन् आरोपीने पत्नीची हत्या केली. आईचा मृत्यू झाला तर वडील आता कारागृहात डांबले जातील, यामुळे मुस्कान आणि तिच्या लहान भावाचा दोष नसताना त्यांच्या डोक्यावरून आईवडिलांचे छत्र हिरावले गेले आहे. त्यामुळे मुस्कान आणि तिच्या भावाला आता मुंबईतील आजीकडे राहावे लागणार आहे.
पतीने केली पत्नीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2017 6:08 PM