मुंबई: विवाहित शेजारणीशी अनैतिक संबंध ठेवून, तिच्यासोबत राजरोसपणे राहायला लागल्यानंतर, आपल्या लग्नाच्या बायकोचा अनन्वित छळ करून, तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील एका पतीला, मुंबई उच्च न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास ठोठावला आहे.पेण तालुक्यातील जांभुळटेप गावातील काशीबाई या महिलेने १८ वर्षांचा संसार व तीन मुले झाल्यानंतर, २५ जुलै २००० रोजी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह तीन दिवसांनी मिळाला होता. काशीबाईचा भाऊ मनोहर याने केलेल्या फिर्यादीवरून नागोठणे पोलिसांनी काशीबाईचा पती भगवान तुकाराम भोईर, त्याचे जिच्याशी विवाहबाह्य संबंध होते ती भारती उर्फ कुसुम भोईर व दामोदर नथु भोईर अशा तिघांविरुद्ध भादंवि कलम ४९८(अ) (विवाहितेचा छळ करणे) आणि ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) या गुन्ह्यांसाठी खटला भरला होता. रायगड सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २००२ मध्ये तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. या विरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात केलेले अपील न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांनी मंजूर केले व आरोपी भगवान भोईरला कलम ४९८ (अ) साठी दोन वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि कलम ३०६ साठी पाच वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. शिक्षा भोगण्यासाठी भगवानने तीन आठवड्यांत पोलिसांकडे हजर व्हायचे आहे. भारती व दामोदर यांना निर्दोष ठरविणारा सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला गेला.शेजारी आणि नात्यात असलेल्या गजानन भोईर (एसटी कंडक्टर) याची पत्नी भारती हिच्याशी विवाहबाह्य संबंध जुळल्यापासून, भगवान याने काशीबाईचा छळ सुरू केला. तो काशीबाईला सोडून भारतीसोबत पेण येथे वेगळा राहू लागला. तिन्ही मुलांनाही तो घेऊन गेला. काशीबाईला तो चरितार्थासाठी एक रुपयाही देत नसे, उलट तिने पिकविलेले शेतही त्याने कापून नेले. भगवान याने काशीबाईला राहत्या घरातूनही निघून जाण्यास फर्मावले. ऐकले नाही, तेव्हा तिच्या घराची वीज तोडली व घराचा दरवाजाही उखडून काढून नेला. नीचपणाची परिसीमा म्हणजे, एक दिवस भगवान याने काशीबाईच्या घरी येऊन तिच्या गुप्तांगात लाकूड घुपसले. रक्तबंबाळ झालेल्या काशीबाईला त्यावेळी चार दिवस नागोठणे येथील आयपीसीएल इस्पितळात दाखल करावे लागले होते.या घटनेनंतर प्रदीर्घ काळ लोटला असला, तरी भगवान याने काशीबाईचा ज्या क्रूरपणे छळ केला ते पाहता, शिक्षेच्या बाबतीत त्याला अजिबात दया दाखविता येणार नाही, असे न्या. फणसाळकर-जोशी यांनी नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)सत्र न्यायालयाचे ताशेरेभारती व भगवान यांच्या अनैतिक संबंधांमुळे भारतीच्या पतीनेही तिच्यापासून घटस्फोट घेतला. काशीबाईचा भाऊ, मावशी व भारतीचा पती यांच्या साक्षींतून भगवानने काशीबाईचा कसा व किती छळ केला, हे नि:संदिग्धपणे सिद्ध होत असूनही, सत्र न्यायालयाने ‘अशा साधारण घटना संसारात घडतच असतात,’असे म्हणून भगवानला निर्दोष सोडले होते. सत्र न्यायालयाचा हा दृष्टिकोन असंवेदनशील व विकृत आहे, असे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले.
पत्नीच्या आत्महत्येबद्दल पतीला शिक्षा
By admin | Published: December 13, 2015 1:36 AM