ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९ : लग्नाला सहा वर्षे उलटूनही मुल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली. सुरेश बीजे (४०) आणि प्रीती सुरेश बीजे (३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
पवई येथील साई बागुरडा गावात बीजे दाम्पत्य राहायचे. त्यांचा प्रेमविवाह आहे. लग्नाला सहा वर्ष उलटूनही मुल होत नसल्याने दोघांमध्ये खटके उडायचे. याबाबत प्रीतीवर उपचारही सुरु होते. गेल्या वर्षभरापासून सुरेशलाही डोकेदुखीचा त्रास सुरु झाल्याने त्याने नोकरी सोडली. त्यानंतर तो घरीच राहायला लागला. घरीच राहत असल्याने तो तिला मारझोड करी. तिने बहीण मिनाकडे वेळोवेळी याबाबत सांगितले होते. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास प्रीती घरी आली. रात्री आठच्या सुमारास भाजी नेण्यासाठी आलेल्या चुलत बहीणीने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने तिने नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.
नातेवाईकांनी तेथे धाव घेत दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तेथील खिडकीच्या काचेतून सुरेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तत्काळ घराचे छप्पर तोडून सुरेशच्या भावाने घरात प्रवेश केला. आतून कडी उघडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली प्रीती आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत सुरेशला पाहून कुटुंबियांना धक्का बसला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती त्यांना रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल न होण्यावरुन मंगळवारी दोघांमध्ये भांडण झाल्याचा संशय आहे. याच रागात सुरेशने हातोड्याने पत्नीच्या डोक्यावर घाव केले. त्यानंतर तिच्या हाताची नस कापून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. प्रीतीच्या डोक्यावर हाताड्याने तब्बल पाच घाव करण्यात आले आहे. याप्रकरणी सुरेशविरोधात हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी कुठल्याही स्वरुपाची सुसाईट नोट पोलिसांना सापडलेली नाही. मात्र तेथील एका लाईट बिलावर झगडा असे नमूद करण्यात आले आहे. त्या शेजारीच पेन पडलेला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुरेशने हे लिहिले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुसाईट नोटवरील हस्ताक्षर नेमके कुणाचे याचा तपास सुरु असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.