ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 18 : मेहुण्याच्या लग्नात सासऱ्याने अंगठी का घातली नाही म्हणून रुसलेल्या जावयाने रागाच्या भरात दोघा मुलांसमोरच पत्नीला हौदावर आपटून, बेदम मारहाण केली आणि विहिरीत फेकून दिले़. गावात येऊन पत्नी विहिरीत पडल्याची आवई उठविली. त्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आरोपी पतीस गुरुवारी ताब्यात घेतले.प्रगती दत्ता भिसे (वय २७, रा. मुरुड, जि. लातूर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. प्रगती भिसे यांच्या भावाचा विवाह सोहळा मंगळवारी (१६ मे) ढोकी (ता. उस्मानाबाद) येथे होता. या विवाह समारंभासाठी दत्ता भिसे, त्यांच्या पत्नी, मुलगा चैतन्य आणि मुलगी भावना हे चौघेजण दोन दिवस अगोदर ढोकी येथे गेले होते. दरम्यान, दत्ता याने मला सोन्याची अंगठी घातली तर मी लग्नासाठी थांबतो, अन्यथा जातोअसे सासऱ्यापुढे सांगितले. तेव्हा सासऱ्यांनी सोने घालण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे रागाच्या भरात आलेला दत्ता हा मुरुडला परतला. मंगळवारी त्याच्या मेहुण्याचे लग्न झाले. मात्र मला कसलाच निरोप देण्यात आला नसल्याचा राग मनात धरून तो बुधवारी दुपारी ४ वाजता ढोकी येथे सासरवाडीस गेला. दरम्यान, दारातच उभा राहून पत्नी व मुलांना गावाकडे परत जायचे आहे असे म्हणून बोलावून घेतले आणि या तिघांना दुचाकीवर बसवून मुरुडकडे निघाला. वानवडा पाटीवरून जवळच्या मार्गे कच्च्या रस्त्याने तो गावानजिक असलेल्या नारायण कणसे यांच्या विहिरीजवळ आला. तिथे दुचाकी उभी करून पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, पत्नीला उचलून विहिरीवर असलेल्या पाण्याच्या हौदावर आपटले. त्यामुळे प्रगती गंभीररित्या जखमी होऊन आरडाओरड करू लागली. त्याकडे दुर्लक्ष करीत त्याने पुन्हा काठीने मारून तिला विहिरीत फेकून दिले आणि मुलांना घेऊन गावात आला. गावात पोहोचताच पत्नी विहिरीत पडल्याचा कांगावा सुरू केला. दरम्यान, मुलांनी पाहिलेली घटना आजी, आजोबांना रात्री सांगितली. त्यामुळे कुटुंबातील सर्वजण फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलिसांनी गुरुवारी सकाळी दत्ता भिसे याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळाकडे धाव घेऊन मयत प्रगती हिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दरम्यान, मयत प्रगती हिच्या माहेरकडील मंडळींनी दत्ताविरुद्ध तक्रार दिल्याने कलम ३०२, ३२४, ३२३, ४९८ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश उनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली.
काठी, फुटलेल्या बांगड्या जप्त... मुरुड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दत्ता याने वापरलेली काठी आढळून आली. तसेच फुटलेल्या बांगड्याही सापडल्या. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
कुटुंब व नातेवाईकही फरार... दत्ता भिसे हा गेल्या काही वर्षांपासून मुरुड येथे राहत आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील, पती-पत्नी व दोन मुले राहतात. ही घटना घडल्यानंतर संपूर्ण कुटुंब फरार झाले. गुरुवारी सकाळी त्याच्या घरास कुलूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर दत्ता याच्या चार बहिणीही गावातच राहतात. मात्र त्यांच्याही घरांना कुलूप असल्याचे पोलिसांना आढळून आले.
मृतदेह शासकीय रुग्णालयात... प्रगती हिचा मृतदेह गुरुवारी सकाळी पाण्याबाहेर काढण्यात आला. शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीसाठी मुरुडच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती सपोनि. रफिक सय्यद यांनी दिली.