शिरवळ : येथील बसस्थानकात रात्री मुक्कामी असणारी एसटी बस अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खळबळजनक घटना पहाटे उघडकीस आली. मात्र, तासाभरानंतर चोरीस गेलेली बस बारा किलोमीटर अंतरावर खंडाळा परिसरात सापडल्याने आगारप्रमुखांचा जीव भांड्यात पडला.पारगाव-खंडाळा आगाराची एसटी बस (एमएच १२ ईएफ ६०८८) शिरवळ-कर्नवडी, खंडाळा व त्यानंतर खंडाळा-लोणंद आणि शिरवळ अशी फेऱ्या मारते. शनिवारी (दि. ११) या एसटीने फेरी पूर्ण केल्यानंतर चालक नाना सीताराम शिलवंत (रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांनी बस शिरवळ बसस्थानकाच्या आवारात लावली. त्यानंतर ते झोपण्यास गेले. पहाटे पाच वाजता ते एसटीकडे आले असता जाग्यावर बस दिसली नाही. त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. चक्क एसटी बसच चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही तत्काळ ठिकठिकाणी बिनतारी संदेश पाठवून एसटी चोरीस गेल्याचे सांगितले.शिरवळ बसस्थानकातून एसटी चोरीस गेल्याचे नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी बसस्थानकात गर्दी केली. एवढी मोठी एसटी चोरट्याने कशी चोरून नेली, याविषयी नागरिकांमधून चर्चा सुरू होती. सकाळी सातच्या सुमारास चोरीस गेलेली एसटी खंडाळा- धावडवाडी रस्त्यावरील एका कंपनीसमोर लावली असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेतली. चोरट्यांनी एसटी तेथेच सोडून पलायन केल्याचे समोर आले. काही वेळानंतर पोलिसांनी ही बस आगारप्रमुखांच्या ताब्यात दिली.चक्क एसटीच चोरीस गेल्याने सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
हुश्श... चोरलेली एसटी बस सापडली!
By admin | Published: July 12, 2015 10:49 PM