नवी मुंबई : महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राजवळील वृक्षलागवडीसाठी असलेल्या भूखंडावर व शेजारील सिडकोच्या जागेवर अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या होत्या. तुर्भे विभाग कार्यालयाने विशेष मोहीम राबवून सर्व झोपड्या हटविल्या आहेत. जुईनगर व सानपाडा यांच्या मध्यभागी महापालिकेचे मलनि:सारण केंद्र आहे. या केंद्राच्या बाजूचा भूखंड महापालिकेला वृक्षलागवडीसाठी उपलब्ध करून दिला आहे. केंद्राच्या दुसऱ्या बाजूला सिडकोचा भूखंड आहे. गत काही महिन्यांपासून येथे झोपड्या उभारण्यास सुरवात झाली होती. जवळपास २५० झोपड्या उभ्या राहिल्या होत्या. झोपड्यांसाठी येथील वृक्ष तोडले जात होते. सदर अतिक्रमण लक्षात येताच विभाग अधिकारी भरत धांडे व अतिक्रमण विरोधी पथकाने विशेष मोहीम राबवून सदर भूखंडावरील सर्व अतिक्रमण हटविले आहे. दोन्ही भूखंड अतिक्रमणमुक्त केले असून पुन्हा तिथे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. >सानपाड्यामध्ये प्रदर्शन भरत असलेल्या मोकळ्या जागेवरही अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. त्या झोपड्याही हटविल्या आहेत. महापालिकेने केलेल्या कारवाईचे या परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. पुन्हा या परिसरात अतिक्रमण होवू नये यासाठी प्रशासनाने योग्य काळजी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी सिडकोकडे व्यक्त केली आहे. महापालिका व सिडको प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण मोहीम हाती घेतली असून यामुळे अनेकांनी धसका घेतला आहे. काही दुकानदार व नागरिक स्वत:हून अतिक्रमण हटवित आहेत तर काही ठिकाणी बंदोबस्तात कारवाई सुरू आहे.
हरित पट्ट्यातील झोपड्या हटविल्या
By admin | Published: June 11, 2016 2:57 AM