हैदराबाद - 'दिशा' रेड्डी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना पहाटे घडली. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. खासदार मनेका गांधी यांनीही जे घडलं ते भयानक आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही या घटनेबाबत आपल मत व्यक्त केलंय.
हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर कायद्याला धरून नव्हतं, हे एन्काऊंटर अयोग्य होतं' असं स्पष्ट मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. तर, संसदभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मनेका गांधींनी आपलं मत परखडपणे मांडलं. जे झालं ते देशासाठी अतिशय भयानक आहे. केवळ तुम्हाला तसं करायचंय, म्हणून तुम्ही लोकांचा जीव घेऊ शकत नाहीत. तुम्ही कायद्याला हातात घेऊ शकत नाहीत. त्या आरोपींना न्यायालयाकडून फाशी मिळणार होतीच, असेही गांधींनी म्हटलंय. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कायद्याची प्रक्रिया पूर्ण करुन चौकात फाशी दिली असती तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असती. हैदराबाद बलात्कार प्रकरणात न्याय झालेला आहे, परंतु ही पद्धत अन्यायकारक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या घटनेतील आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आला. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी आपलं मत मांडलं.