लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून तब्बल ९६६ कोटींच्या देणग्या देणाऱ्या हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) या कंपनीला राज्यातील विविध प्रकल्पांची कोट्यवधींची कंत्राटे मिळाली आहेत. महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनपासून ते रस्ते, बोगदे याचबरोबर मुंबईतील बेस्ट उपक्रम, एसटी महामंडळ आणि पुणे महानगरपालिकेसाठी इलेक्ट्रिक बस सेवा पुरविण्यातही या कंपनीचा सहभाग आहे.
राज्यात कोणकोणती कामे मिळाली?
- मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात बीकेसी स्थानक उभारणी.
- एमएमआरडीएकडून उभारण्यात येणाऱ्या ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या दोन पॅकेजेसची तब्बल १२ हजार ५७ कोटी रुपयांची कामे.
- सिडको पाणीपुरवठा योजनेच्या बोगद्याचे १,०३० कोटींचे कंत्राट.
- एमएमआरडीएच्या वर्सोवा-भाईंदर सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील बोगद्यांची ६ हजार कोटींची कामे.
- मुंबई महापालिकेच्या पश्चिम उपनगरांतील १०६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामाचे कंत्राट.
- मेघा इंजिनीअरिंगची उपकंपनी असलेल्या ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीकडून बेस्ट ४,५०० ई-बस, एसटी महामंडळ ५,१५० ई- बस भाडेतत्त्वावर घेणार.
- पुण्यातील पीएमपीएलला १२३ बसेस ओलेक्ट्राने दिल्या आहेत.