हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारणाऱ्या नराधमांचं एन्काऊंटर केल्यामुळे समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीही पोलिसांच्या या कृतीचं कौतुक केलं आहे, तर या सगळ्या प्रकारावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत कायद्याचा धाक राहणार नसल्याची मल्लिनाथी केली आहे. त्यानंतर आता यासंदर्भात राजकीय नेत्यांकडूनही बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकारावर भाष्य केलं आहे. जेवढी माहिती मला मीडियाच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्यानुसार एन्काऊंटर जे काही झालेलं आहे, त्यासंदर्भात लोकांमध्ये तीव्र भावना पाहायला मिळते. बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असं लोकांचं मत आहे. आता माझ्याजवळ त्यासंदर्भातली जास्त माहिती नाही. त्यामुळे मी अधिक बोलणार नाही, पण बलात्काऱ्यांना मृत्युदंड मिळायला हवा आणि तो कायद्यानं मिळाला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान हैदराबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच आरोपींना अटक करण्यात आली होती. पीडितेच्या हत्येप्रकरणी पोस्ट मॉर्टेम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले होते.
प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियंकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून, ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली, तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत, असं सांगितलं. थोड्या वेळाने कॉल करते असं सांगून पीडितेने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.