पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : राज्यसभेवर अलीकडेच एका छत्रपतींची नियुक्ती झाल्यावर ‘जाणते राजे’ असलेल्या एका नेत्याने आता फडणवीस छत्रपतींची नियुक्ती करू लागले, अशी धूर्त टिप्पणी करून अस्मितेच्या द्वेषाग्नीवर फुंकर घातली होती, असे सांगत ज्येष्ठ समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांनी उजव्या असहिष्णू प्रवृत्तीपेक्षा असे दांभिक पुरोगामी अधिक धोकादायक असल्याची टीका केली.‘पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता’ या विषयावर डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात संपन्न झालेल्या परिसंवादाचे डॉ. कवठेकर हे अध्यक्ष होते. राकेश वानखेडे यांनीही कवठेकर यांच्या सुरात सूर मिसळत पवार यांनाच लक्ष्य केले. शेतकरी आत्महत्येबाबत ‘जाणते राजे’ मूग गिळून गप्प बसतात आणि जातीय लढ्यात असभ्य वक्तव्ये करून जातीय विद्वेष निर्माण करतात, असे वानखेडे म्हणाले. याच परिसंवादात बोलताना कवयित्री नीरजा यांनी मात्र हिंदुत्ववादी शक्तींच्या असहिष्णुतेला लक्ष्य केले. समानतेवर आधारलेली आपली समाजव्यवस्था धर्मव्यवस्थेवर आधारित करण्याची धडपड सुरू असल्यानेच सध्या पुरोगामी विचारवंत, दलित, महिला यांना लक्ष्य केले जात आहे. विचार पटला नाही, तर खून करण्यापर्यंत मजल मारण्याच्या विकृतीची सुरुवात नथुराम गोडसे याच्यापासून झाली. सध्याचे सरकार आपल्या पाठीशी उभे राहील, याची खात्री वाटत असल्यानेच हिंसाचाराचे झाड बहरले आहे, असे नीरजा म्हणाल्या. प्रा. कवठेकर म्हणाले की, देशातील असहिष्णुता १९९० नंतर वाढू लागली. कारण, त्याच सुमारास मंडल आयोगावरून वाद पेटला आणि बाबरी मशिदीचे पतन झाले. या दोन्ही घटना एकमेकांच्या प्रतिक्रिया होत्या, असा अनेकांचा ग्रह आहे. पवार यांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, जातीची बंधने दूर केली पाहिजेत, असे म्हणणारे जातीयतेला कशी फुंकर घालतात, त्याचे हे उदाहरण आहे. मात्र, विचारवंत याबाबत मौन बाळगतात आणि अप्रत्यक्षपणे असहिष्णुतेला खतपाणी घालतात. उजवे जेवढे असहिष्णू आहेत, तेवढेच डावे असहिष्णू आहेत. उजवे काय भूमिका घेणार, हे तरी माहीत असते. त्यामुळे त्यांचा प्रतिवाद करण्याची तयारी करता येते. परंतु, डाव्यांकडून अपेक्षा एका भूमिकेची असते आणि ते भूमिका वेगळीच घेतात. त्यामुळे असहिष्णू प्रवृत्तीपेक्षा दांभिक पुरोगामी, उदारमतवादी म्हणवणाऱ्यांची सोयीची सहिष्णुता अधिक धोकादायक आहे.कवयित्री नीरजा म्हणाल्या की, सहिष्णुता म्हणजे भारतीयत्व, असे पं. नेहरू यांनी म्हटले होते व विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात असहिष्णुता हा भारताचा स्वभाव नाही, असे स्पष्ट केले आहे. १९९० नंतर देशातील साम्यवादी-समाजवादी गट मागे पडून भांडवलशाही-उजव्या विचारसरणीच्या हातात सत्ता गेल्यानंतर देशातील असहिष्णुता वाढीस लागली आहे. बाबरी ते गोध्रा या घटना त्याचे प्रत्यंतर आहे. उदारीकरणानंतर तर आर्थिक विकास, हाच मुख्य विकास हे जीवनाचे सूत्र बनले आहे. मूल्यविकास आणि समानतेवरील आधारित समाजव्यवस्था मागे पडून धर्मव्यवस्थेवरील समाजव्यवस्थेचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळेच दाभोलकर-पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांना लक्ष्य केले जात आहे. दलित व स्त्रिया यांच्या संरक्षणाकरिता केलेल्या कायद्यांचा गैरवापर केला जात असल्याची आवई उठवून हे कायदे रद्द करण्याची धडपड सुरू आहे. अशा वातावरणातही छोट्या पुरोगामी चळवळी सुरू असून तोच आशेचा किरण असल्याचे त्यांनी नमूद केले.राकेश वानखेडे म्हणाले की, आपण कधीच सहिष्णू नव्हतो. आपल्या अनेक संतांचे मृत्यू नैसर्गिक नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे व राजाराम महाराज हे असहिष्णुतेचे बळी ठरले. पेशवाईत तर असहिष्णुतेचा कळस झाला होता. (विशेष प्रतिनिधी)अंमलबजावणीचा आढावा घ्या!महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील मंडळींना १९९० नंतर सांसदीय राजकारणाची चटक लागली. राजकारणात त्यांनी अनेक तडजोडी केल्या. पुरोगामी चळवळी थांबल्याने निर्माण झालेली पोकळी सुटाबुटांतील एनजीओंनी भरली. लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेवर आघात झाला. सध्या तर जातीयवादाचे समर्थन करणाऱ्यांना ज्ञानपीठ दिले जात आहे, तर खोटा इतिहास लिहिणाऱ्यांना महाराष्ट्रभूषण देऊन गौरवले जात आहे. प्रा. राजेंद्र दास म्हणाले, जेव्हापासून आपली फक्त कमावण्याची मानसिकता झाली, तेव्हापासून प्रत्येक माणसाला किमतीचा टॅग लावू लागलो. हा माणूस किती उपयोगाचा आहे, हे पाहून संबंध ठेवू लागलो, तेव्हापासून असहिष्णुता बोकाळली. सर्व क्षेत्रांतील सत्ताकारणाकरिता उपद्रवमूल्य असलेली माणसे हाताखाली ठेवू लागलो. पक्षांपेक्षा गटांचे प्राबल्य सर्व प्रकारच्या सत्ताकारणात वाढले. ज्या शालेय शिक्षणात मूल्यशिक्षणाद्वारे संस्कार व्हायला हवे होते, ते न झाल्याचे हे परिणाम आहेत.राकेश वानखेडे म्हणाले, आपण कधीच सहिष्णू नव्हतो. आपल्या अनेक संतांचे मृत्यू नैसर्गिक नाहीत. शिवाजी महाराज, संभाजीराजे व राजाराम महाराज हे असहिष्णुतेचे बळी ठरले. मूल्यविकास आणि समानतेवर आधारित समाजव्यवस्था मागे पडून धर्मव्यवस्थेवरील समाजव्यवस्थेचे महत्त्व वाढले. त्यामुळेच दाभोलकर-पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांना लक्ष्य केले जात आहे.
दांभिक पुरोगामी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2017 4:12 AM