मुंबई - राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याच्या कारणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केलेली असताना राज ठाकरे यांनीही अप्रत्यक्षपणे गुजरातला प्रकल्प जाण्यावरून नाराजी व्यक्त केली. प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच जातो याचे वाईट वाटते. पंतप्रधानांसाठी सर्वच राज्य समान असली पाहिजे असं राज यांनी म्हटलं होते.
राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटलं की, पंतप्रधान सगळ्या राज्यांना समान वागणूक देतात. आज विकासाच्या गुंतवणुकीत केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून महाराष्ट्रात लागला आहे. मी राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहे. प्रकल्प दुसऱ्या राज्यात जातात परंतु आपल्या राज्यातून बाहेर प्रकल्प जाऊ नये ही आपली जबाबदारी आहे. ती आपण पाळू अशी ग्वाही फडणवीसांनी स्पष्ट शब्दात दिली.
काय म्हणाले होते राज ठाकरे?पंतप्रधान हे देशाचे आहे. देशाच्या बाबतीत त्यांना सर्व राज्य एकसमान असली पाहिजेत. उद्या महाराष्ट्रातील हा प्रकल्प आसामला गेला असता तर मला वाईट नसते वाटले. गुजरात देशातच आहे. परंतु जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय. त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष द्यायला हवं. प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर राज ठाकरे महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यात संकुचित म्हणण्यासारखं काय आहे. पंतप्रधानांनी विशाल विचार करायला हवा असं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवालमहाराष्ट्रातील प्रकल्प आणि बाहेर जाणारे प्रकल्प याबाबत चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचे सरकार येऊन तीन महिनेच झाले आहेत. आतापर्यंतचे जे प्रकल्प राज्याबाहेर केले आहेत, त्या सर्वांना महाविकास आघाडीचे सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा बाप म्हणजेच रिफायनरी प्रकल्प कुणी रोखला, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. गुंतवणुकीचा बाप असलेला रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्र करणारच असा ठाम निश्चय व्यक्त करताना, ३ लाख कोटींवर गुंतवणूक तसेच १ लाख लोकांना थेट रोजगार, तर ५ लाख लोकांना इतर रोजगार मिळणारा रिफायनरी प्रकल्प कुणी रोखला, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"