डोंबिवली, दि. 28 - कोकणचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मी आक्रमक आहे, उद्धव यांच्यासारखा मेंगळट नाही, असं म्हणत राणेंनी उद्धव यांना लक्ष्य केलं आहे. ते डोंबिवलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.ते म्हणाले, उद्धव कुचक्या मनाचा, रडीचा गेम खेळतोय, उद्धव ठाकरेंनी जेवढा त्रास वडिलांना दिला तेवढा कोणी दिला नसेल. मराठी माणसावर अन्याय व्हायला नको, यासाठी सेनेची स्थापना केलीय. उद्धव ठाकरे जी सेना चालवतात ती आमच्या आक्रमकतेमुळेच उभी राहिलीय. साहेबांनी मराठी माणसाचा रुबाब वाढवला, आताचे दलाल फक्त व्यवसाय करतात, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका केलीय. साहेबांचे माझे वाद नव्हते, माझा वाद उद्धव ठाकरेंशी होता.2005ला मी केवळ उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना सोडली, अशी कबुलीही नारायण राणेंनी दिली आहे. सेनेच्या मंत्र्यांना धड सभागृहात बोलता येत नाही, माझ्या मनात आलं तर सगळ्यांच्या कुंडल्या काढेन, असं म्हणत राणेंनी शिवसेना नेत्यांवरही टीका केली आहे. माझ्या आयुष्यात मला आक्रमकतेमुळे पदे मिळाली, राज्याच्या राजकारणात जे नाव कमावलं ते कोकणी माणसामुळेच कमावलं आहे, कोकणातला विकास थांबलाय म्हणून राजीनामा दिलाय, मी मैदानात खेळणारा आहे, बाल्कनीत नाही, असंही राणे म्हणाले आहेत.कुठलाही काँग्रेस मुख्यमंत्री आला की केवळ नारायण राणेला विरोध, केवळ राणे कुठं जातात काय करतात याकडे लक्ष, मुख्यमंत्रिपदासाठी मला 48 आमदारांनी पसंती दिली, पण नाव अशोक चव्हाणांचं जाहीर केलं, महिने कसेही जातील, पण तीन वर्षे झाली, काही नाही. मी सेना सोडली तेव्हा काँग्रेस नेत्यांनी मला सहा महिन्यांत मुख्यमंत्री करतो असं सांगितलं होतं, मात्र काँग्रेसनं ते आश्वासन पाळलं नाही. माझ्यावर काँग्रेस अन्याय करू शकत नाही, फक्त फसवणूक केली, राज्यात काही करायचे असल्यास काँग्रेसमध्ये राहून करता येणार नाही म्हणून राजीनामा दिला, मराठा आरक्षण मिळवून देणारच आहे, येत्या 1 तारखेला 1 वाजता माझी दिशा जाहीर करणार असल्याचंही राणेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
मी आक्रमक आहे, उद्धव यांच्यासारखा मेंगळट नाही, राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 9:44 PM