पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मुंबईच्या वर्सोवा येथून कोळी बांधवांची दिंडी पंढरपुरात दाखल झाली आहे. डोक्यावर पांढरी टोपी, केशरी आणि पांढºया रंगाचा टि शर्ट, बरमुडा अशी या दिंडीतील वारकºयांची वेशभूषा आहे. पुढील चार दिवस हे वारकरी पंढरपूर मुक्कामी आहेत.
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मानाच्या पालख्या दाखल होतात. अलीकडच्या काही वर्षांत छोट्या-छोट्या दिंड्याही वारीला येत आहेत. वर्सोवा येथील हरिविजय वारकरी मंडळाची दिंडी गेल्या १९ वर्षांपासून पंढरपूरला येत आहे. दिंडीचालक प्रल्हाद रत्ने म्हणाले, वर्सोवातील ३५ ते ४० कोळी बांधवांनी हरिविजय वारकरी मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून सन २००० पासून पायी दिंडीला सुरुवात करण्यात आली. यंदाच्या वर्षी प्रल्हाद द्वारकानाथ टिकले बुवा, नितीन भाटे बुवा, मंगेल चिखले बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली २५ जून रोजी दिंडी निघाली. सुरुवातीला तळेगावपर्यंत पाऊस होता. पण माऊलींचे बोलावणे होते म्हणून ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता चालत राहिले. दररोज किमान ४० किलोमीटरचा प्रवास व्हावा, असा आमचा प्रयत्न असतो. मध्यरात्री अडीचच्या सुमाराला आम्ही चालायला सुरुवात करतो. पहाटे नाष्टा केल्यानंतर सकाळी १० पर्यंत पहिले भोजन होते. ७ जुलै रोजी आम्ही पंढरपुरात पोहोचलो.
रत्ने म्हणाले, वर्षाला आठ महिने कोळी बांधव समुद्रात मासेमारी करतात. दिंडीत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या घरात वारीची परंपरा आहे. आज मुंबईपासून पंढरपूरपर्यंत वाहतुकीच्या बºयाच सुविधा आहेत. पण माऊलींचं बोलावणं असतं म्हणून चालतच येतो. खांद्यावर भगवी पताका, मुखात हरिनामाचा गजर करीत चाललो की, कसला थकवा आणि कसला त्रास. आस असते फक्त विठुरायाच्या दर्शनाची.
पंढरपुरातील पांडुरंग भवनाच्या समोर एका मंदिरात आठ दिवस मुक्काम करतो. पंढरीत दाखल झाल्यानंतर यंदा तीन तास रांगेत थांबून विठुरायाचं दर्शन घेतलं. आषाढी एकादशीचा सोहळा होईपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत.
वाटेत मंदिरांमध्ये असतो मुक्काम - वर्सोव्यातील मंदिरातून दिंडीने प्रस्थान ठेवले की, पहिला मुक्काम घाटकोपर येथील राम मंदिरात होतो. तिथून बेलापूर येथील राम मंदिर, पनवेलमध्ये मार्केट यार्डातील बालाजी मंदिर, माथेरान मार्गावरील चौकात असलेले माऊलींचे मंदिर, खोपोली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, लोणावळा येथील एकविरा मंदिर, तळेगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, देहू, आळंदी येथे गणेशनाथ महाराज संस्था, दिघी, हडपसर येथील मंगल कार्यालय, दिवेघाटातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर, बारामती जिंती खंडोबा मंदिर, फलटण येथील राम मंदिर, बरड येथील मंगल कार्यालय, नातेपुतेच्या पुढे संतोषी माता मंदिर, माळशिरस येथील हनुमान मंदिर, वेळापूरपासून तीन किमीवरील मराठी शाळेतील मुक्कामानंतर पंढरपुरात दाखल.