पुणे : मी मुख्यमंत्री होईन की नाही, हे माहीत नाही. तसेच पुढील काळात मी मंत्रीपदावर असेन किंवा नाही तेही सांगता येत नाही. पण लोकांच्या मनात माझ्या मुख्यमंत्रीपदाचे गणित मात्र पक्के झाले आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी शनिवारी केले.भारती विद्यापीठाच्या ५१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमास खासदार राजीव सातव, ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते. राजीव सातव यांनी पंकजा मुंडे या मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी सदिच्छा व्यक्त केली. त्यावर बोलताना मुंडे म्हणाल्या, मी जेथे जाते, तेथे मुंडे साहेबांची आठवण निघते. मुंडे साहेब प्रत्यक्षात मुख्यमंत्री नसले तरी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होते याची साक्ष मिळते. मी पण मुख्यमंत्रीपदावर असेल की नाही माहीत नाही, पण लोकांच्या मनातील माझ्या मुख्यमंत्री पदाबाबतचे गणित पक्के झाले असल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसते.कार्यक्रमात २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री
By admin | Published: May 11, 2015 5:04 AM