सांगली - राज्यसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी किंबहुना शिवसेनेला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत शिवसेनेने उभा केलेला दुसरा उमेदवार संजय पवार यांना पराभव सहन करावा लागला. तर संख्याबळ नसतानाही भाजपाला ३ जागा निवडून आणण्यात यश आले. त्यानंतर महाविकास आघाडीत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मविआत फूट पडली अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, मी डबा आहे आणि उद्धव ठाकरे माझे इंजिन आहे. तीन पक्ष म्हटल्यावर एवढे होणारच आहे. ते आमची खेचणार, आम्ही त्यांची खेचणार हे चालणारच आहे. ते त्यांच्या पक्षाचा विचार करतात मी माझ्या पक्षाचा विचार करेन. ज्या पक्षाचा मी मंत्री त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार करणं माझे काम आहे असं त्यांनी सांगितले. तर महाविकास आघाडीत फूट पडेल का या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, भाजपा-शिवसेनेचीही खेचाखेची व्हायची. आय लव्ह यू म्हणायचं नंतर लफडी करायची हे चालतेच आहे. मी डबा आहे आणि उद्धव ठाकरे माझे इंजिन आहेत. तुम जहा कहोगे, मै वहा जाऊंगा असं विधान त्यांनी केले.
शिवसेनेचा आमदार फुटला नाही राज्यसभेची एक जागा निवडून आली म्हणजे गावातील पैलवान निवडून आलाय असं चाललं आहे. शिवसेनेचा एकही आमदार फुटला नाही. अपक्ष आमदारांनी मते वेगळी दिली. शिवसेनेच्या आमदारांनी मते दुसरीकडे दिली असती तर मुख्यमंत्र्यांचा अपयश म्हणता येते. निवडणुकीत हार-पराजय होत असतो. एका खासदाराची जागा आली नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या चर्चेच्या गोष्टी आहेत असं गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच संजय राऊतांनी जे विधान केले त्यांच्यावर काही बोलू शकतो. महाविकास आघाडीत फूट पडो की काहीही होवो मला फरक पडत नाही. मी शिवसेनेचा आहे. मी डबा आहे माझ्या इंजिनाकडे बघतो. यश-अपयश सुरू असतं असंही त्यांनी म्हटलं.