मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र, नियोजित कामामुळे संजय राऊत यांना ईडी (ED) कार्यालयात जाता आले नाही. त्यानंतर ईडीकडून संजय राऊतांना दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले आहे. दुसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या समन्समध्ये १ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, संजय राऊत आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. यासंदर्भात एक ट्विट करत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना टॅग केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले, मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला जारी करण्यात आलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये, असे आवाहन करतो. काळजी करू नका म्हणत त्यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि शरद पवार यांनाही (Sharad Pawar) ट्विटमध्ये टॅग केले आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याच्या प्रकरणात ईडीला संजय राऊत यांची चौकशी करायची आहे. त्या अनुषंगाने ईडीने सोमवारी संध्याकाळी राऊत यांना समन्स जारी करत मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले होते. मंगळवारी चौकशीसाठी जाणार नसल्याचे संजय राऊत यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी संजय राऊत यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने ईडी कार्यालय गाठले आणि ईडीला ज्या मुद्द्यांची चौकशी करायची आहे, त्याची कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ लागेल, त्यासाठी १४ दिवसांची मुदत द्यावी, असा अर्ज सादर केला. मात्र, संजय राऊत यांचा मुदतवाढीचा अर्ज ईडीने फेटाळला असून, त्यांना १ जुलैला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे दुसरे समन्स जारी केले आहे.