मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्यातील विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, ओबीसी हा मोठा वर्ग आहे. या समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. समाजाच्या हक्कासाठी मी सभेला जातोय, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, रासपचे महादेव जानकर, शब्बीर अन्सारी, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रमुख ओबीसी नेत्यांची या सभेस प्रमुख उपस्थिती राहणार असून, सभेच्या निमित्ताने राज्यातील ओबीसी आपली एकजूट दाखवणार आहे. या सभेला जाण्यापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधली. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी हा मोठा वर्ग आहे. या समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. समाजाच्या हक्कासाठी मी सभेला जात आहे. दुसऱ्याच्या हक्काचे कोणी हिरावून घेऊ नये. संविधानाच्या संरक्षणचे कवच आहे ते तोडण्याचे काम कोणी करू नये.
याचबरोबर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "मी काही संदेश देणार नाही या बाबत अनेकदा व्यक्त झाले आहे. माझ्या शिव शक्ती यात्रेत ही मांडले आहे. ज्यावेळी घटना घडल्या, त्या वेळी माझी भूमिका मांडली आहे. आता वेगळं काही मांडण्याची आवश्यकता नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे, माझ्या फॉलोअर्सला माहिती आहे. सभेला मी मनापासून शुभेच्छा देते, छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याविषयी आदर आणि प्रेम आहे. मुंडे साहेबांनी जी वंचिताची चळवळ उभी केली त्याच्यात एक सच्चा मित्र म्हणून ते सोबत होते. ते काय बोलतात या विषयी उत्सुकता आहे."
दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे राहिलं आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. अशातच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज सकल ओबीसी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव एल्गार सभा होत आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्तया सभेदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी १२०० पोलिस कर्मचारी, अधिकारी, २०० अधिकारी, कर्मचारी इतर जिल्ह्यातील राहणार आहेत. एसआरपीएफच्या तीन कंपन्या, रॅपिड अॅक्शन फोर्सची एक कंपनी, क्चिक अॅक्शन टीम, ९ स्ट्रायकिंग फोर्स बंदोबस्ताचे काम पाहणार आहे.