मंगेश पांडे, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) : देवादारी झाला काय गुन्हा गंमी नवीन नवरी, नवरा माझा जुना गं। तरुणपणाच्या याला नाहीत खुणा गंमी नवीन नवरी, नवरा माझा जुना गं।।या कवितेला रसिकांनी शिट्या अन् ‘वन्स मोअर’ने भरभरून दाद दिली. महिला आणि शेतकऱ्यांवर आधारित कवितांनाही रसिकांनी टाळ्या वाजवीत दाद दिली. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी रात्री निमंत्रितांचे कविसंमेलन झाले. यामध्ये राज्याच्या विविध भागांतील ३२ कवींनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी प्रफुल्ल शिलेदार होते. उस्मानाबाद येथील उत्तम लोकरे या आजोबांनी सादर केलेल्या ‘साठ वर्षांचा नवरा, वीस वर्षांची नवरी’ या कवितेने संपूर्ण सभागृह खदखदले. शिट्या आणि टाळ्यांची बरसात झाली. त्यांची कविता संपल्यानंतर दुसरे कवी पोडिअमवर आले. मात्र, रसिकांचा ‘वन्स मोअर’चा गलका थांबत नव्हता. अखेर लोकरे यांना ‘वन्स मोअर’ द्यावाच लागला. गुलबर्गा, कर्नाटकातील बी. ए. कांबळे यांनी ‘साल जाईल’ ही कृषी जीवनावर आधारित कविता सादर केली, तर ‘गांधींनी जगाला दिला अहिंसेचा मंत्र, आज का कोणालाच कळत नाही त्याचे सूत्र’ ही चारोळी बडोद्यातील मालिनी सराफ यांनी सादर केली. यासह नागपूरच्या दीपक रंगारी यांनी ‘त्याचं सरण कोणी पेटवून दिलं आणि नाही म्हणता म्हणता, आभाळ पेटल्याची गावभर बोंब झाली’ ही कविता सादर केली.‘पंख पसरू झेप घेऊ, पंथ सांगू नेमका, माणसांना जोडणारा पूल बांधू नेमका’ अशाप्रकारे सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून मार्गक्रमण करणारी ‘पंख पसरू’ ही कविता नागपूर येथील ज्ञानेश्वर वांढरे यांनी सादर केली. नाशिकचे तुकाराम धोंडे, चंद्रपूरच्या माधवी भट, सोलापूरचे सुरेश लोंढे, चंद्रपूरचे पद्मरेखा धनकर आणि पिंपरी-चिंचवडजवळील चिखलीगावातील कवी प्रशांत चव्हाण यांनी विविध कविता सादर केल्या.
मी नवीन नवरी, नवरा माझा जुना गं!
By admin | Published: January 18, 2016 12:48 AM