चेतन ननावरे , मुंबई ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीचे पात्र वठवणाऱ्या अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची लोकप्रियता शिगेला पोहोचली असून, तिची एक छबी टिपण्यासाठी तरुणाई झिंगाट होऊ लागली आहे. परंतु तिच्या या लोकप्रियतेचा अनाहूत त्रास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना झाला. रिंकूच्या फेसबुक पेजवर देसाई यांचा मोबाइल नंबर पोस्ट झाल्याने रिंकू समजून आलेल्या हजारो कॉलमुळे देसाई दोन दिवस पुरते हैराण झाले. ‘अहो... मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय!’ असे सांगता सांगता त्यांची दमछाक झाली.हॅलो रिंकू का... म्हणून एकामागोमाग एक कॉल आल्यानंतर सुरुवातीला देसाई यांनी राँग नंबर असल्याचे शांतपणे सांगितले. परंतु फोन करणारे झिंगाट चाहते ‘मग कोण बोलतंय?’ असे उलट प्रश्न विचारू लागले. त्यावर साहजिकच ‘मी आर्ची नाही.. उद्योगमंत्री बोलतोय!’ असा खुलासा देसाई यांना करावा लागला. जाहीर सभा असो, मिटिंगा असो... मंत्रीमहोदयांचा मोबाइल खणखणायचा आणि उचलल्यानंतर ‘हॅलो... रिंकू का?’ असा पहिला सवाल केला जायचा. यामुळे हैराण झाल्यानंतर शोध घेतल्यावर प्रकरणाचा खुलासा झाला. मात्र, एकूणच प्रकरण झिंगाट असल्यामुळे मंत्रीमहोदयांनी याबाबत चुप्पी साधणेच पसंत केले. ‘हॅलो... रिंकू का?’ म्हणून येणाऱ्या कॉलची संख्या पाहता देसाई यांनी अनोळखी क्रमांक उचलणेच बंद केले होते. मात्र यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची पंचाईत झाली होती. एसएमएस केल्यानंतरच देसाई फोनला उत्तर देत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना त्यांच्या फोनची वाट पाहावी लागत होती.
‘मी आर्ची नाही... सुभाष देसाई बोलतोय!’
By admin | Published: May 10, 2016 4:08 AM