पुणे - कर्नाटक विधानसभेच्या निकालात भाजपाला धोबीपछाड मिळाल्यानंतर आता विरोधकांनी पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कर्नाटकात झालेल्या भाजपाच्या पराभवामुळे विरोधकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. जर विरोधकांनी एकत्रितपणे लढाई लढली तर २०२४ मध्ये भाजपाला सत्तेतून उतरवता येईल असा विश्वास विरोधकांना वाटतो. पण याच विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाची शर्यत लागण्याची शक्यता आहे. त्यात अनेक नेते पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. या शर्यतीत शरद पवार असणार का? या प्रश्नावर खुद्द शरद पवारांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही. आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली त्यातून असे नेतृत्व काढू. माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की अशा नेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत देणे. मी सध्या सर्व विरोधकांशी बोलतोय, मला स्वत:ला उभे राहायचे नाही. मला या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी हातभार लावायचा आहे. माझा तो प्रयत्न सुरू आहे. नितीश कुमारांचा सुरू आहे. अनेकांचा चालू आहे. मी निवडणुकीला उभे राहणार नाही असं त्यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीसांना टोलादेवेंद्र फडणवीसांकडे दुसरे काहीच बोलायला नाही त्यामुळे ते माझ्या आत्मचरित्रात लिहिलेल्या मुद्दे काढत आहेत. एखाद्या बैठकीला येणार सांगितले आणि आले नाहीत. त्या बैठकीबाबत उल्लेख पुस्तकात असेल तर त्यात दोषारोप होत नाही असं सांगत शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.
महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा नाहीमहाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा झाली नाही. माझ्याच घरी बैठक झाली, तिघांनी बसून चर्चा करावी, काही अडचण आली तर मी, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी आणि इतर काँग्रेस नेते असतील ते आहोत. जागावाटपावर चर्चा झाली नाही. गेले २ दिवस माध्यमात वाचतोय त्यात तथ्य नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एका विचाराने काम करतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.