"मी अजित दादांसोबत नाही, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे"; नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 08:48 AM2024-06-19T08:48:06+5:302024-06-19T08:49:03+5:30
छगन भुजबळ यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. लोकसभेचं तिकिट नाकारल्याने आणि राज्यसभेवरही न पाठवल्याने छगन भुजबळ हे नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, खरंच असं आहे का? छगन भुजबळ नाराज आहेत का आणि ते पक्षांतर करतील का? त्यावर दस्तुरखुद्द छगन भुजबळांनी उत्तर दिले आहे.
नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ यांनी एबीपी माझासोबत बोलताना या सर्व अफवा असल्याचे सांगत मी अजितदादांसोबत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, असे म्हटले आहे. "विधानसभेआधी अथवा नंतर मी कुठेही जाणार नाही. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. कायमच राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहीन", असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच, "मी नाराज आहे, दुसऱ्या नेत्यांना भेटलो आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांची भेट घेतली, या सगळ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. मला जर कुणाला भेटायचं असेल तर मी उघडपणे भेटेन", असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
याचबरोबर, "माझ्या नाराजीच्या चर्चा साफ खोट्या आहेत. मी नाराज नाही. राजकारणात नाराज होऊन चालत नाही. राजकारणात प्रत्येकजण नाराज होतो अन् दुसऱ्या दिवशी कामाला लागतो. कमी जागा मिळाल्यामुळे राहुल गांधी नाराज असतील, मोदीसाहेबही नाराज असतील. शरद पवारही नाराज असतील.. देवेंद्र फडणवीसही नाराज असतील.. अजित पवारही बारामतीची जागा का गेली, यामुळे नाराज असतील. ज्याप्रमाणे नाराजीनंतर सर्व नेते कामाला लागले, तसेच मीही कामला लागलो आहे. मी नाराज नाही किंवा कुणालाही भेटलो नाही", असेही छगन भुजबळ म्हणाले.
भुजबळांनी सांगितला सगळा घटनाक्रम
१० जून : मी षण्मुखानंद हॉल येथील कार्यक्रमात होतो.
११ जून : आमच्या लोकांबरोबर मी होतो
१२ जून : अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली होती, त्या बैठकीत उपस्थित होतो.
१३ जून : राज्यसभेसाठी अर्ज भरायला विधानसभेत होतो.
१४ जून : पुण्यात गेलो होतो, तिथे काही बैठका घेतल्या. फुलेवाड्याच्या कामासाठी पुण्यात होतो.
१५ जून : येवल्यात होतो. तेथील हवं तर तेथील पत्रकारांना विचारा.
१६ जून : संध्याकाळी मी मुंबईत आलो.
दरम्यान, "मी अजितदादांसोबत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे", असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.