मला निवडणुकीसाठी 'घड्याळ' चिन्हाची चिंता नाही: शरद पवार असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 05:45 PM2023-08-16T17:45:11+5:302023-08-16T17:46:09+5:30
सत्तेचा गैरवापर होतोय. केंद्रातील अधिकाराचा गैरवापर करून राजकीय पक्ष, शक्ती कशी अडचणीत आणता येईल हे त्यांचे धोरण आहे अशा निशाणाही पवारांनी भाजपावर लावला.
छत्रपत्री संभाजीनगर – शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. अजित पवारांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेत शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी पक्षावरच दावा केला आहे. पक्ष आणि चिन्ह आमचेच आहे असं अजित पवार गटाने म्हटलं आहे. तर मला घड्याळ चिन्हाची चिंता नाही असं विधान शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निर्णय त्यांचा स्वत:चा असेल तर चिंता नाही. परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबतीत जो निर्णय झाला, त्यात केंद्र सरकारमधील शक्तिशाली घटकाचा त्यात हस्तक्षेप झाला आणि धनुष्यबाण चिन्ह, नावाचा निकाल आला. तोच प्रयोग आमच्या बाबतीत सुरू असल्याचे दिसते. पण याप्रकारच्या मागण्या निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. त्याचा खुलासा आमच्याकडे आयोगाने मागितला. ते बघितल्यानंतर निश्चित आम्हाला काळजी वाटते असं त्यांनी सांगितले.
परंतु व्यक्तिश: मला चिन्हाची चिंता नाही. माझ्या आयुष्यात मी १४ निवडणूक लढवल्या. सुदैवाने प्रत्येक निवडणूक मला जनतेने विजयी केले. १९६७ साली मी पहिली निवडणूक लढलो तेव्हा माझं चिन्ह बैलजोडी होते. त्यानंतर चरखा, गाय-वासरु, हात अशा चिन्हांवर मी लढलो. आणि शेवटची निवडणूक मी लढलो ते चिन्ह घड्याळ होते. आज इतक्या चिन्हे असताना आम्ही निवडणूक जिंकलो. त्यामुळे मला चिन्हाची चिंता नाही. पण सत्तेचा गैरवापर होतोय. केंद्रातील अधिकाराचा गैरवापर करून राजकीय पक्ष, शक्ती कशी अडचणीत आणता येईल हे त्यांचे धोरण आहे अशा निशाणाही पवारांनी भाजपावर लावला.
दरम्यान, ज्यावेळी आपल्याला यश मिळणार नाही याची खात्री पटते तेव्हा माणूस या मार्गाला जातो. मला सध्या देशातील चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही. हिंदुस्तानाचा नकाशा पाहिला तर केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल तिथे भाजपा सरकार नाही. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा इथली सरकारे पाडून भाजपा सत्तेत आले. निवडणुकीपूर्वी भाजपाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार जनतेने केलाय. त्यामुळे मी पुन्हा येईल असं कितीही म्हटलं तरी त्यांची स्थिती देवेंद्रसारखी होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही असंही शरद पवारांनी सांगितले.