काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 05:07 PM2024-07-02T17:07:18+5:302024-07-02T17:15:19+5:30
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलण्यासाठी अशोक चव्हाण उभे राहिले होते. यावेळी धनखड यांनी चव्हाणांचा बायोडेटा सांगितला.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात राज्यसभेमध्ये जागा मिळविणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आज महत्वाचे वक्तव्य केले आहे.
तसे केंद्रात नवीन नसलेल्या अशोक चव्हाणांची ओळख राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड सभागृहाला करून देत होते. यावेळी धनखड यांनी चव्हाणांचा आजवरचा राजकीय प्रवास सभागृहाला सांगितला. दोनवेळा मुख्यमंत्री, दोनदा लोकसभा सदस्य, ४ वेळा आमदार, विधान परिषद सदस्य असे धनखड म्हणाले. यावेळी विरोधकांनी ते काँग्रेसमधून झालेले आहेत, भाजपातून नाही असे धनखड यांना उद्देशून म्हटले. यावर चव्हाण यांनी लगेचच आपली प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलण्यासाठी अशोक चव्हाण उभे राहिले होते. यावेळी धनखड यांनी चव्हाणांचा बायोडेटा सांगितला. यावर चव्हाण म्हणाले की, सभापती जी मी तुमचा आभारी आहे. तुम्ही संक्षिप्तमध्ये माझा बायोडेटा सांगितला. काँग्रेसमधून मी निवडून आलो याचा मला गर्व आहे. यात कोणतीही शंका नाहीय, असे ते म्हणाले.
पिता पूत्र चारही सभागृहांचे सदस्य, वेगळाच विक्रम...
काँग्रेस सोडल्यानंतर अशोक चव्हाणांनी भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर पाच वर्ष विरोधात राहिलो असतो. दिल्लीत आमचे विरोधी पक्षांचे सरकार येण्याचा प्रश्नच नव्हता. मग काय करायचे? विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो, असे वक्तव्य केले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावे एक आगळा विक्रम नोंदविला गेला आहे. ‘चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले पिता-पुत्र’ असा अनोखा विक्रम आता त्यांच्या नावे आहे. शंकरराव चव्हाण हे दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण हे एकदा मुख्यमंत्री होते. वडील आणि मुलगा अशा दोघांनीही मुख्यमंत्रिपद भूषविल्याचे हे अनोखे उदाहरण आहे. शंकरराव चव्हाण मुंबई प्रांतासह पाच वेळा विधानसभेचे सदस्य होते. एकदा ते विधान परिषदेचे सदस्य राहिले. दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले. तीन वेळा ते राज्यसभेचे खासदार होते.