ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - मला मुख्यमंत्री करा असं आवाहन जाहीररीत्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला केले आहे. भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री असेल असे संकेत अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्यानंतर भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस सुरू झाली आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी प्रथमच मुख्यमंत्री होण्याची तयारी जाहीररीत्या दर्शवत एकाचवेळी भाजपाला व मनसेला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे मुलाखतीमध्ये म्हणाले की मुख्यमंत्री होण्याची माझी तयारी आहे, परंतु अखेर हा निर्णय जनतेनेच घ्यायचा आहे. नरेंद्र मोदींचा चेहरा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून देण्यात आला, आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही असाच चेहरा हवा असून, माझ्यामध्ये लोकांना तो चेहरा दिसत असेल तर चांगलंच असल्याचं ठाकरे म्हणाले. मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे आणि जबाबदारीपासून मागे हटणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदीलाटेची भीती दाखवून आम्ही घाबरणारे नाही असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला असून शिवसेना भाजपाच्या दबावापुढे झुकणार नाही असे संकेच ठाकरे यांनी दिले आहेत.