राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये थांबले आहेत. आपल्याकडे एकूण ४६ आमदारांचे समर्थन असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिंदेंनी परत यावे, असे भावनिक आवाहनही केले होते. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असा प्रस्तावही दिला होता. कालपासून आजपर्यंत राज्यात झालेल्या संपूर्ण राजकीय घडामोडींसंदर्भात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट ऑनलाईन पद्धतीने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ज्यांनी मी नको त्यांनी फक्त मला येऊन सांगावे, मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार, असे उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना उद्देशून म्हटले आहे.
ठाकरे म्हणाले, कमलनाथ आणि शरद पवार यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले, आम्ही तुच्या सोबत आहोत. पण माझीच लोक म्हणत असतील तर आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री नकोत, तर मग काय म्हणायचे? बंडखोर आमदारांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, सुरतला जाऊन काय बोलायची गरज होती? इथे बोलायचे. समोरा समोर बोलायचे. मी आजही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. मी आज माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हालवतो. कोणताही मोह मला खेचू शखत नाही. पण हे माझ्या समोर येऊन बोलावे.
मी राजभवनात पत्र घेऊन जाऊ शकत नाही कारण... -आज मी माझ्या राजीनाम्याचे पत्र करून ठेवतो आहे. तुम्ही या आणि माझ्या राजिनाम्याचे पत्र राजभवनात घेऊन जा. मी पत्र घेऊन जाऊ शकत नाही कारण मला कोवीड झाला आहे. एवढेच नाही, तर जोवर माझ्यासोबत बाळासाहेबांनी जोडून दिलेले शिव सैनिक आहेत. त्यामुळे मी कोणत्याही संकटांना सामोरे जाण्यास तयार आहे. असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
पदे येत असतात आणि जात असतात पण... -ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे, असे वाटत असेल त्यांनी मला सांगावे. मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पदे सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा. या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. शेवटी पदे येत असतात आणि जात असतात, शेवटी पदावर बसल्यानंतर तुम्ही काय काम करतात. यावर जनतेची जी प्रतिक्रिया येते ती तुमची कमाई असते, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.