ईडीच्या पथकाने आज (रविवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडूप परिसरामधील मैत्री बंगल्यावर धाड टाकली आहे. यानंतर आता, राऊतांच्या घराची झाडाझडती सुरू झाली आहे. यासंदर्भात, "रोज सकाळी आपल्या सर्वांची सकाळ खराब करणाऱ्यांचीच सकाळ आता खराब झाल्याने, निश्चितपणे समाधान वाटत आहे. तसेच पत्रचाळमध्ये जे गरीब रहिवासी होते, जे मराठी कुटंब होते. त्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा मला विश्वास आहे," असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
राणे म्हणाले, "संजय राऊत नावाचा व्यक्ती स्वतःला फार मोठं समजायची आणि झुकेगा नही वैगेरे डायलॉक म्हणायची, आता त्यांना विचारा आतमध्ये... शेवटी भ्रष्टाचार करायचा, महिलांवर अत्याचार करायचा, त्यांना त्रास द्यायचा आणि त्यांना वाटत असेल, की त्यांना कधीच काही होणार नाही. तर आता त्यांना, ईडीची चौकशी काय असते आणि दुसऱ्यांना त्रास देणे काय असते. हे निश्चित कळत असेल."
कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीची टीम आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. सध्या शोधमोहिम आणि चौकशी सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान, राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे.
तत्पूर्वी, ईडीने संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. परंतु संसदेचे अधिवेशन सुरू असल्याचे सांगत ते ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यांनी ईडीकडे मुदतवाढ मागितली होती. मात्र, आज अचानकपणे ईडीचे अधिकारी राऊतांच्या घरी पोहोचले आहेत.