मुंबई :
मी कंत्राटी मुख्यमंत्री असल्याची टीका तुम्ही केली. होय ! मी राज्याच्या विकासाचे कंत्राट घेतलेला, सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे कंत्राट घेतलेला आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे कंत्राट घेतलेला मुख्यमंत्री आहे. दिल्लीत मी मागच्या रांगेत बसलो म्हणून तुम्ही मला हिणवले. अहो ! रांग नाही, काम महत्त्वाचे असते, असे चिमटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत गुरुवारी विरोधकांना काढले.
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी सुनावले की, तुमच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून वैचारिक दिवाळखोरीतून तुम्ही आरोप करीत आहात. जीवन उसी का मस्त है, जो समाज के उन्नती मे व्यस्त है, परेशान तो वही है जो दुसरे की खुशी से त्रस्त है. माझ्याकडे टॅलेंट आहे, पण तुम्ही मला वाव दिला नाही. माझ्यातील कलागुणांना कधीही प्लॅटफॉर्म दिला नाही. मी हे आधीही बोललो असतो, पण संधी मिळाली नाही. मी कोणाबद्दल द्वेष बाळगत नाही. बिलो द बेल्ट; पातळी सोडून बोलणार नाही, माझे पाय जमिनीवरच असतील. पूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्यांना पुरून उरायचे. आता आम्ही ‘एक से भले दो’ आहोत.
नागपुरातील हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून
- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी संस्थगित झाले. हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होईल, अशी घोषणा विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. गेली २ वर्षे नागपुरात अधिवेशन होवू शकलेले नाही.
- त्यामुळे यावेळी तेथील अधिवेशन यावेळी तीन आठवड्यांचे होईल असे मानले जात होते. मात्र १९ डिसेंबरपासून सुरू होणारे अधिवेशन, त्यातच नाताळची सुटी आणि ईअरएंडमुळे नागपूरचे अधिवेशनही कमी कालावधीचे असेल असे चित्र आहे.
गोंधळ न घालता सरकारला उत्तरदायी केले हेच यश : पवारआम्ही ठरवून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालून कामकाज बंद पाडले नाही. तसे केले असते तर सरकारने गोंधळात कामकाज आटोपले असते. आम्ही चर्चेद्वारे सरकारला उत्तरदायी केले, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले की, सरकारने बहुमताच्या जोरावर विधेयके मंजूर केली, पण एकही विधेयक आम्ही चर्चेविना मंजूर होऊ दिले नाही. सरकारने अधिवेशनात असंवेदनशीलता दर्शविली. ओला दुष्काळ जाहीर केला नाही.
मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी
- विरोधकांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, उपसली तलवार आम्ही; तुम्ही उगा थरथरू नका, हात असतील निर्मळ, तर भय मनी बाळगू नका. धनुष्य आहे अन् बाण भात्यात आहे, कशास तुम्हास चिंता कोण जात्यात आहे.
- उत्तम विरोधक म्हणून विकासकामांसाठी सरकारला साथ द्या. मशाल आहे घेतली हाती, आता खाली ठेवणे नाही, मार्ग सत्याचा असे धरला, आता मागे फिरणे नाही.
- काँग्रेसच्या अवस्थेवर ते म्हणाले, इंदिराजींच्या काळात तुमचा होता वट, पण टोमणेसेनेबरोबर तुमची झाली फरपट.