नाशिक - मी माझी भूमिका स्पष्ट केलीय, मी त्याचा बाप, तळावर राहून मी जनतेची मनं जिंकली. शरद पवारांच्या कार्यक्रमात पोरगा फक्त सत्कार करायला गेला होता. माझा पोरगा अजून आज्ञाधारक आहे. त्याचा बाप डोकेबाज आहे. त्यामुळे तो लढायचं म्हणत असेल तर लढणार नाही गृहित धरा. माझा मुलगा कुठेही वावगं बोलला नाही. तो काय बोलला हे मी ऐकलं. मी जिथे आहे तिथेच आतापर्यंत आहे. त्यामुळे गद्दारीचा विषयच नाही. मी अजितदादांसोबत आधीही होतो आणि आजही आहे. लढायचा विषय आला तरी अजितदादांसोबतच अशी स्पष्ट भूमिका आमदार नरहरी झिरवाळ यांनी मांडली आहे.
नाशिक इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित केला होता. त्याला झिरवाळांनी हजेरी लावली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, लोकसभेला आम्ही कुठेही कमी पडलो नाही. स्थानिक उमेदवार असतो तेव्हा सहानुभूतीचा उद्रेक होतो. मी अजितदादांसोबत गेलो आहे. मी नाराज नव्हतो. विधानसभेची तयारी सुरू आहे. पूर्वतयारी म्हणून अजित पवार प्रत्येक मतदारसंघात येणार आहेत असंही नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं.
तसेच राजकारणात प्रत्येकाला मी काहीतरी केले पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतात. माझ्या मुलानं त्याचं भांडवल आधी उभं करावं. शरद पवार हे सर्वांचे दैवत आहे. राजकारणात ज्या घडामोडी होतात त्यात पसंतीक्रम असतो. त्या पसंतीक्रमात मी अजित पवारांसोबत आहे. पहाटेचा शपथविधी झाला तेव्हाही मी अजित पवारांसोबत होतो. यावेळी झाला तेव्हाही मी अजितदादांसोबत आहेत असं आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
दरम्यान, त्याचा बाप अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून इथवर पोहचलाय, माझ्याही पेक्षा मोठा व्हायचं असेल तर त्याने तिथूनच सुरूवात करतो. एकदम मोठं होणं त्यानंतर ५-१० वर्ष समजून घ्यायला जातात. जयंत पाटील इथं आले तेव्हा त्यांचा सत्कार करायला जाऊ का असं मुलाने म्हटलं तेव्हा ठीक आहे जा, सत्कार करून निघून ये असं मी म्हटलं होतं. पण हा गेला की गेला, लगेच आमदार होण्यापर्यंत मजल गेली तर कसं होईल असं सांगत नरहरी झिरवाळांनी स्वत:च्या मुलाला कानपिचक्या दिल्या. काही दिवसांपूर्वी चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.