मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी रोखठोक भूमिका घेत थेट पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. त्यात बंडखोर आमदारांचा गट भाजपात सहभागी होणार का? असा प्रश्न शिवसैनिक विचारू लागले आहेत. त्यामुळे अनेकांमध्ये संतापाची लाट आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच" असं म्हटलं आहे.
रामदास कदम (Shivsena Ramdas Kadam) यांनी मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही असं सांगितलं. यासोबतच "मी पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. मी कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. मुलांना मतदारसंघात त्रास दिला जातो हे खरं आहे. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच असणार आहे" असं कदम यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटात सहभागी असलेले दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी ट्विट करत शिवसैनिकांना आवाहन केले आहे. योगेश कदम ट्विटमध्ये म्हणतात की, सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. मुळात तशी गरज ही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्याचसोबत ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी शिवसैनिक अशा प्रकारे योगेश कदम यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे शिंदे गट भाजपात सहभागी होणार नाही असा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी बंडखोर आमदारांनी वेगळा गट बनवला असल्याने त्यांना निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्षात सहभागी व्हावे लागेल. अशावेळी भाजपा किंवा प्रहार हे दोन पर्याय त्यांच्याकडे आहेत असं सांगितले.