"मी सुद्धा आरे ला कारे करू शकतो, पण…’’ शिवतारेंवरून अजित पवारांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 06:40 PM2024-03-20T18:40:22+5:302024-03-20T19:30:26+5:30
Ajit Pawar News: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघातील पारंपरिक विरोधकांनी अजित पवारांचं टेन्शन वाढवलंय. विजय शिवतारे यांनी तर इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विजय शिवतारे यांच्या भूमिकेबाबत विचारणा केली असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.
अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर यावेळच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. कुटुंबात पडलेल्या फुटीमुळे आमने-सामने आलेल्या पवार कुटुंबातील उमेदवारांमध्ये होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मात्र या लढतीपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या पारंपरिक विरोधकांनी त्यांचं टेन्शन वाढवलंय. विजय शिवतारे यांनी तर इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशाला दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विजय शिवतारे यांच्या भूमिकेबाबत विचारणा केली असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.
अजित पवार हे आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना विजय शिवतारे यांच्या बंडखोरीचा फटका बारामतीमध्ये बसेल का असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, मला त्याबद्दल अजून काही माहिती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना काही आवाहन केल्याचं मी वृत्तवाहिन्यांवर पाहिलं होतं. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचं ऐकायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे. आम्हीही आरेला कारे करू शकतो. मात्र मला महायुतीमधील वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कारण मी काही विधान केलं की त्याचा विपर्यास केला जातो, असे अजित पवार म्हणाले.
यावेळी काही सहकारी साथ सोडून शरद पवारांकडे जात असल्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, कुणी कुणाची भेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणी कुणाला बांधून ठेवू शकत नाही. ज्याला ज्याचे विचार पटतील तो त्याच्या पद्धतीने त्यांच्या भेटी घेऊ शकतो. जे आमच्या बरोबर येतील, त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ, असेही अजित पवार यांनी सांगितले.