मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अब्दुल सत्तार यांची नाराजी मी दूरू दूरू शकतो असे वक्तव्य नाराजी दूर करण्यासाठी तिसऱ्यांदा भेटीला गेलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे.
अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी सत्तार यांना अपेक्षा होती. त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपद दिले. तर औरंगाबादमधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मात्र कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज झाले. अखेर आज त्यांनी खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर जवाबदारी देण्यात आली असून, खोतकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री औरंगाबादेत अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा झाली होती. तर याचवेळी खोतकर यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे सत्तार यांच्यासोबत फोनवरून बोलणं करून दिले असल्याची ही बोलले जात आहे. तर सत्तार यांची नाराजी दूर झाली असून ते उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सुद्धा खोतकर म्हणाले आहे.