मुंबई - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) मणिपूर आणि काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. सरसंघचालकांचं विधान पंतप्रधान किती गांभीर्याने घेणार माहिती नाही. आता तरी मोदी मणिपूरला जाणार का असा सवाल करत ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, मणिपूरवर १ वर्षाने मोहन भागवत बोलले, मणिपूरबाबत सरसंघचालकांनी जे काही सांगितले त्याला पंतप्रधान गांभीर्याने घेणार आहेत का?, सरसंघचालक बोलल्यानंतर तरी पंतप्रधान मणिपूरला जाणार आहे का? कारण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संघाची आम्हाला गरज राहिली नाही असं जेपी नड्डा म्हणाले होते. सध्या शपथविधी सोहळे सुरू आहेत. काश्मीरात हल्ले होतायेत. त्याकडे सरकार लक्ष देणार आहे की नाही? मला सरकारच्या नाही तर देशाच्या भवितव्याची काळजी आहे. ४०० पार होणारे २४० वर अडकलेत. त्यामुळे मोदी सरकारचं एनडीए सरकार झालं असा टोला ठाकरेंनी लगावला.
तर अनिल परब यांनी माझा पदवीधर मतदार म्हणून उल्लेख केला त्यामुळे माझी पदवी खरी असल्याचं सिद्ध झालं असं सांगत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मोदींना चिमटा काढला. पदवीधर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा आमचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांनी नेतृत्व केले होते. सुशिक्षित मतदारांचे वेगळे प्रश्न असतात. पदवी मिळाल्यावर पुढे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. पदवीधरांसाठी काही वचने अनिल परब यांनी दिली आहे. गेली ५ टर्म मतांच्या रुपाने मुंबईकर शिवसेनेला आशीर्वाद देतायेत. शिवसेना-मुंबईकर या नात्याला आणखी मजबूत करून आजपर्यंत जसं पाठीशी उभे राहिला तसं यावेळीही उभे राहाल ही अपेक्षा आहे. २६ जूनला कार्यालयात जाण्यापूर्वी मतदानाचं कर्तव्य बजावून शिवसेनेला आशीर्वाद देऊन कामाला जावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी पदवीधरांना केले.
महाविकास आघाडीत बिघाडी नाही
दरम्यान, महाविकास आघाडीत बिघाडी नाही. संवादात थोडं लूज कनेक्शन होतं,कारण मी निवडणूक झाल्यावर सात आठ दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळात तारखा जवळ आल्या होत्या. त्यामुळे सर्व पक्षाने विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले होते. दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून माझ्याशी आणि संजय राऊतांशीही फोनवरून संवाद झाला. त्यामुळे नाशिक, कोकण याबाबत आम्ही समझौता करतोय. निवडणूक झाल्या झाल्या मी इथं नव्हतो. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायचे सुरू होते. अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला म्हणून आम्ही अर्ज भरले होते असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
कोकणच्या जागेवर ठाकरे गट माघार घेणार
नाशिक पदवीधर ही आमची सिटिंग जागा आहे. आमचा उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला असला तरी त्या जागेवर फार तशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याची गरज नव्हती. कोकणची जागा काँग्रेसला मिळतेय. काल रात्री चर्चा झाली. त्यात नाना पटोलेही सहभागी होते. प्रत्येक चर्चेत उद्धव ठाकरेंना आणलंच पाहिजे असं नाही. आम्ही उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार पक्षात काम करतो. ते पक्षाचे प्रमुख आहेत. कोकणच्या जागेवर आम्ही माघार घेतोय. नाशिकच्या जागेवर काँग्रेसनं माघार घ्यावी असं ठरलं आहे. चारही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढू आणि जिंकू असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला.