उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि राहुल नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी कायदेतज्ज्ञांसह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते. "नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि तिथं सांगावं शिवसेना कुणाची?" असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. "सुप्रीम कोर्टाकडून आता शेवटची आशा आहे. लोकशाहीचा मूलभूत घटक असणाऱ्या जनतेच्या न्यायालयात आपण आलो आहोत! सरकार कोणाचंही असलं तरी, सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे. माझं आव्हान आहे. नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि तिथं सांगावं शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा."
"शिवसेना जर तुम्ही विकली असाल तर मी जिथे जिथे जातो, तिथे तिथे शिवसैनिक माझ्यासोबत कसे?, राज्यपालांना विनंती करतो, एक अधिवेशन पुन्हा बोलवा आणि मिंध्यांना सांगतो, विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा. मी तुम्हाला पाठिंबा देतो. हाकला त्यांना... व्हीपचा अर्थ आहे चाबूक... चाबूक लाचारांच्या हातात शोभत नाही. शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या हातात शोभतो" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.
"मला सत्तेचा मोह नव्हता, एका क्षणात मी वर्षा सोडलं आणि एका क्षणात मुख्यमंत्री पदही सोडलं. आपल्या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार की लवाद त्याच्या डोक्यावर बसणार, हे पाहण्याची ही लढाई आहे. आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल. ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन पण लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही?"
"सुप्रीम कोर्टाने तयारी करून दिली, पण लवाद म्हणतो, यांना फाशी कशी देऊ? यांच्या जन्माचा दाखलाच नाही. कोर्टाने जन्माचा दाखला तपासण्यास नाही तर जो गुन्हा केलाय त्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं. सगळे पक्ष संपवून देशात एक पक्ष राहणार, हे एका राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो तर लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का?" असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.