बारामती - बारामतीच्या दौऱ्यावर असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आईला भेटायला आल्यावर या भेटीचे फोटो काढण्यावरून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. मीसुद्धा बारामतीला आईला भेटायला येतो, मात्र फोटो काढत नाहीस असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
अजित पवार एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतान म्हणाले की, मला काठेवाडीवरून मुंबईला पाठवलं. गेलो ना तिथे. राहतोय ना तिथे. कधी म्हटलंय का मला राहायचं आहे. मला राहायचं आहे. मीसुद्धा आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही. भेट घेतो आणि जातो. आताही ही सभा संपल्यावर आईला भेटायला जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
राज्य सरकारने केलेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली. त्यांचा रोख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाकडे होता. एक जिल्हा सांभाळताना मला नाकी नऊ येत होते. सहा सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद घेणारे काम कसं करणार? तरीही देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा, अशा खोचक शब्दात अजित पवार यांनी टोला लगावला.
यावेळी बारामतीमधील सहकारी संस्थ्यांच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जी जबाबदारी जनता आपल्यावर देईल. आपले वरिष्ठ आपल्यावर देतील. आपले सहकारी आपल्यावर देतील. आपले सभासद आपल्यावर देतील. त्यापद्धतीनं तुम्हाला मला वागावच लागेल, असे ते म्हणाले.