मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा; काँग्रेसच्या 'या' आमदाराने पक्षश्रेष्ठींना घातली साद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 03:02 PM2024-07-14T15:02:55+5:302024-07-14T15:07:25+5:30

विधानपरिषद निवडणुकीवरून सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना हिरामण खोसकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

I did not do cross voting in Legislative Council elections reveals Congress MLA hiraman khoskar | मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा; काँग्रेसच्या 'या' आमदाराने पक्षश्रेष्ठींना घातली साद

मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा; काँग्रेसच्या 'या' आमदाराने पक्षश्रेष्ठींना घातली साद

Congress MLA ( Marathi News ) : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्यामुळे महाविकास आघाडीची चांगलीच नाचक्की झाली. या निवडणुकीत काँग्रेसची तब्बल आठ मते फुटल्याची चर्चा रंगत आहे. यामध्ये माजी काँग्रेस नेते आणि सध्या भाजपमध्ये असलेले राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असलेले आमदार आणि इतर काही आमदारांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचंही नाव या यादीत घेतलं जाऊ लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला असून माझी बदनामी थांबवा असं आवाहन केलं आहे.

विधानपरिषद निवडणुकीवरून सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना हिरामण खोसकर म्हणाले की, "माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याची बदनामी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्ष हायकमांडने थांबवली पाहिजे. माझ्यावर कारवाई करायची असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी मतदान चेक करा. मी फुटलो, असं जे सांगितलंय जातंय ते पक्षाने आणि प्रसारमाध्यमांनी थांबवलं पाहिजे," असं आवाहन खोसकर यांनी केलं आहे.

नाना पटोले यांनी काय इशारा दिलाय?

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या सात आमदारांच्या नावासह मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आजच अहवाल पाठवला आहे. या आमदारांसाठी विधानसभा निवडणुकीत पक्षाची दारे बंद असतील, लवकर त्यांच्यावर पक्ष कठोर कारवाई करेल, असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी ‘लोकमत’ ला सांगितलं. 
 
ज्यांनी कालच्या निवडणुकीत पक्षाची साथ सोडली त्यांना किंमत मोजावी लागेल. चंद्रकांत हंडोरे जून २०२२ मधील राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तेव्हाही काही जणांनी पक्षाशी गद्दारी केलेली होती. त्यावेळी चौकशी समितीही नेमलेली होती, त्यावेळी पक्षाला दगा देणारे आमदार याहीवेळी तसेच वागले. आणखी काही नावे त्यात जोडली गेली, असे पटोले म्हणाले. 

"पक्षाशी निष्ठा न ठेवणाऱ्या लोकांचा कचरा या निमित्ताने गेला, असं मला वाटतं. हे लोक कधीही पक्षाला धोका देऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत यांच्यापैकी एकालाही तिकीट दिले तर तो इंदूर पॅटर्न करून महायुतीसोबत जाऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यापैकी एकालाही विधानसभेचे तिकीट देऊ नये, अशी भूमिका मी पक्षश्रेष्ठींना पाठवलेल्या अहवालात मांडली आहे," अशी माहिती पटोले यांनी दिली.

Web Title: I did not do cross voting in Legislative Council elections reveals Congress MLA hiraman khoskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.