जळगाव : पंचवीस वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणारे माझ्यासह काही मोजके लोक होते. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी व पक्ष वाढीसाठी स्थानिक पातळीवर मी स्वत: निर्णय घेत होतो. पक्षाकडे जात नव्हतो म्हणून आज घरी बसलो आहे, अशी खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नवे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी व्यक्त केली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर गुरुवारी पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत बैठक झाली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पदाधिकारी त्यास उपस्थित होते.जिल्हा परिषदेत ४० जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. मात्र युती झाल्यास ६० जागा जिंकू शकू. त्यामुळे शिवसेना व भाजपा युतीसाठी आग्रही असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पाचोरा तालुक्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षवाढीसाठी मैत्री बाजूला ठेवली तर निश्चित जागा वाढतील, असे त्यांनी सांगितल्यानंतर एकच हशा पिकला. चंद्रकांत पाटील म्हणाले, खडसे व महाजन यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाहीत. (प्रतिनिधी)
पक्षाकडे गेलो नाही, म्हणून घरी बसलो!
By admin | Published: January 06, 2017 4:06 AM