ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 19 - सत्तेला लाथ मारायला मला एका क्षणाचाही विलंब लागणार नाही असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केल्यास सरकार पडू देणार नाही. कर्जमाफी द्या, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो असं जाहीर आवाहन केलं.
सत्तेत असतानाही विरोध केला कि प्रश्न विचारतात कि सत्तेत असून विरोध कसा, पण आमची बांधिलकी समाज आणि शेतकऱ्यांशी आहे. मुख्यमंत्री विरोधात असताना कर्ज माफी मागायचे आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रूपांतर झाले आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाही. मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय. शेतकरी कर्ज मुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देऊ असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळकरंटे नाही. कर्जमाफी तात्पुरता इलाज असेल, पण तात्पुरता तरी इलाज करा, पुढचं पुढं बघू अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून माझी तळ पायाची आग मस्तकात गेली होती. आता शेतकरी रडणार नाही, साल्यांची सालपटं काढणार असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवेंना लगावला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध केला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करुन समृद्धी महामार्ग नको. मुंबई-नागपूर या दोन्ही राजधान्या जवळ याव्यात, पण शेतकऱ्यांचा सत्यानाश करुन नाही. समृद्ध मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीवर वरवंटा फिरवून नको असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा फायदा काय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
तूरीवर बोलताना उद्धव ठाकरेंनी तूर घोटाळा झाल्याचा आरोपही केला. सरकारने तूर घोटळा केला, तुरीचे बम्पर पीक येणार माहित असताना तूर आयात केली असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करत विदेशातून काळा पैसा आणून देणार होते त्याचे काय झाले ? ते आणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. शेतक-याला कर्जमुक्त करु नका, पण त्याच्या खात्यात स्विस बँकेतील 15 लाख आधी टाका अशी मागणी केली.