ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - मी ट्रेलर नव्हे, तर पिक्चर दाखवतो. शिवसेना, भाजपाकडे पैसे आहेत माझ्याकडे नाहीत. दुसरे पक्ष पैशांच्या जोरावर लोक विकत घेत आहेत, असा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर केला आहे. मुंबई मनपा निवडणुकीत स्वबळावर लढणार असून, सर्व जागा लढवणार असल्याचंही राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. मनसेच्या अधिकृत फेसबूक पेजवरून ते लाईव्ह चॅट करत होते. दरम्यान, नाशिक महापालिकेचं कर्ज फेडून मी कामे करून दाखवली आहेत. नाशिकमध्ये केलेले काम इतर शहरात दाखवा. अजूनही बरीच माणसे माझ्यासोबत विश्वासाने आहेत. मी परत 60 नगरसेवक निवडून आणेन, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी वर्तमानपत्रांवरही टीका केली.
(राज ठाकरेंनी केले लोकमतचे कौतुक)
सेना आणि भाजपाने 30 वर्षं मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगली आहे. मनसेच्या चांगल्या कामावर कोणीच बोलत नाही. काही न करणा-या लोकांच्या हातात तुम्ही राज्य देऊ शकता, तेच राज्य माझ्या हातात द्या, मी विकास करून दाखवतो, असं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केलं आहे. सर्व टोलनाके माझ्यामुळेच बंद झाले, मात्र तरीही मनसेला कोणी शबासकीची थाप देत नाही, अशी खंत त्यांनी फक्त केली. नोटाबंदीमुळे सर्वजण त्रासलेले असताना भाजपाला मात्र त्याचा फटका कसा बसत नाही? असा खडा सवाल त्यांनी विचारला. तसेच परप्रांतीयांचा मुद्दा मी सोडलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्ता एकत्र उपभोगत असताना सेनेच्या भ्रष्टाचारात भाजपा कशी सहभागी नाही, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. समुद्रात शिवस्मारकाचा पुतळा कसा उभारणार, तुमच्याकडे तेवढा पैसा आहे का ?, माणसे जिवंत राहण्यासाठी पैसे खर्च करत नाही, मात्र नको त्या गोष्टींवर सरकार पैसे खर्च करत आहे. निवडणुकीच्या तोंडावरच शिवस्मारकाचा घाट घातला जातोय, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. शिवस्मारकापेक्षा गडकिल्ल्यांची डागडुजी करा, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला आहे.