Ajit Pawar : "राज्यातलं बदललेलं राजकीय वातावरण मला पसंत नाही," अजित पवारांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 09:35 AM2022-02-28T09:35:45+5:302022-02-28T09:39:19+5:30
सध्या राज्यातील एकूणच राजकीय परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
Ajit Pawar : सध्या राज्यातील एकूणच राजकीय परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. रविवारी रायगडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी यावर भाष्य केलं. "सध्या जे काही सुरू आहे ते मला अजिबात पसंत नाही. ही आपली महाराष्ट्राची पद्धत नाही," असं ते म्हणाले.
"महाराष्ट्राची निर्मिती होऊन साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्या काळात कशी पद्धत होती. विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात आम्ही आठ वर्ष काम केलं. तेव्हा गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षाचे नेते आणि विलासराव देशमुख सत्ताधारी पक्षाचे नेते होते. त्यांच्या भाषणात एकमेकांना चिमटे काढले जात होते, परंतु खालच्या पातळीवर राजकारण कधीही झालं नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचीही एकमेकांवर टीकाटिपण्णी व्हायची. परंतु त्यांचे मित्रत्वाचे संबंध अखेरपर्यंत राहिल्याचं आपण पाहिलं. तसं मात्र आताच्या काळात होताना दिसत नाही. हे दुर्देव आहे. जे चुकीचं बोलतायत अशा सर्वपक्षीय नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. त्यात सुधारणा केली पाहिजे," असं अजित पवार म्हणाले.
"वादंगाची बातमी मध्यतरी एका वृत्तपत्रात आली होती. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. एका पक्षातही वाद असू शकतात. तीन पक्ष आणि अन्य छोटे पक्ष एकत्र येतात. अशात भांड्याला भांड लागल्यावर थोडा आवाज येतोच. परंतु कोणीही काही काळजी करण्याचं कारण नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतो हे अनेकदा महाराष्ट्रानं दाखवून दिलं आहे. आम्हीही महाविकास आघाडीतील प्रमुख लोक ते दाखवून देऊ," असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.