मनीषा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पहिल्या मुलीनंतर दुसऱ्या वेळी वंशाला दिवा होण्याचे स्वप्न भंगल्याने नकोशीला व्हेंटिलेटरवर सोडून आई गायब झाल्याची घटना सायन रुग्णालयात घडली आहे. त्यामुळे ही आठ दिवसांची तान्हुली आईच्या प्रतीक्षेत व्हेंटिलेटरवर अखेरच्या घटका मोजत आहे. या घटनेनंतर सायन पोलिसांनी या आईचा शोध सुरू केला आहे.डोंबिवली परिसरात वैजंती शिरसाट पती आणि मुलीसोबत राहते. २१ जून रोजी प्रसूतिकळा होत असल्याने तिने एकटीने सायन रुग्णालय गाठले. त्याच दिवशी रात्री आठ वाजता तिने मुलीला जन्म दिला. वैजंतीला पहिलीही मुलगी आहे. या वेळी तिला मुलगा होईल, असे स्वप्न तिने रंगवले होते. मुलगी झाल्याचे समजताच तिने तिच्याकडे बघणेही नापसंत केले. बुधवारी रात्री तान्हुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालय प्रशासनाने आईचा शोध सुरू केला. तेव्हा वैजंती तेथे नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे रुग्णालयाने याबाबत सायन पोलिसांना कळविले. त्यानुसार, पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला. रुग्णालयात दाखल होताना वैजंतीने अपूर्ण माहितीची नोंद केल्याने तपासात अडचण निर्माण होत असल्याचे सायन पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी या प्रकरणी डायरी नोंद करत तपास सुरू केला आहे. सायन रुग्णालय प्रशासनाने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, वैजंतीने प्रसूतीच्या ३४ दिवसांपूर्वी सोनोग्राफी केली होती. त्यात अनेक अनुवांशिक आजारांमुळे अर्भकाचे डोके मोठे असल्याचे समोर आले होते. अशा प्रकरणांमध्ये बाळाची आयुर्मर्यादा कमी असते. असे तिला सांगण्यात आले होते. या परिस्थितीत मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या आजार आणि विद्रूप दिसण्यामुळे तिने मायेचा स्पर्शही न करता दूर सारले. पहिल्या दिवसापासून मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मुलीच्या देखरेखीसाठी तिला तेथे जाण्यास सांगितले असता ती जाण्याचे नाटक करून पुन्हा मागे येत असल्याचे समोर आले. यापूर्वीही अशीच एक आई मुलीला सोडून निघून गेल्याची माहितीही रुग्णालय सूत्रांकडून देण्यात आली.
‘नकोशी’ला व्हेंटिलेटरवर सोडून आई गायब
By admin | Published: June 30, 2017 3:17 AM