मुंबई - गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवरूनच सरकारचा बहुतांश राज्यकारभार पाहिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत, ते मंत्रालयात जात नाही. ते राज्यकारभार घरातूनच चालवत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असतो. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच घरातून काम करण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे.
या संदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे. त्या वृत्तानुसार घरून काम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मला मंत्रालयात जाऊन पाट्या टाकायला आवडत नाही. मी घरून होईल तेवढे काम करतो. काम कुठूनही करा घरातून करा किंवा मंत्रालयातून करा, जनतेचं काम होणं, त्यांच्या समस्या सुटणं महत्वाचं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यात सुरू झालेल्या जुगलबंदीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. काही जण म्हणताहेत की दिवाळीनंतर बॉम्ब फोडू. पण राजकीय बॉम्ब फोडायला दिवाळी लागत नाही. मी तर पाकिस्तानात बॉम्ब कधी फुटतील, याची वाट पाहतोय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
तसेच शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालाबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेला महाराष्ट्राबाहेरील पहिला खासदार उद्या मिळणार असून, दादरा नगर हवेलीवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.